महानगरपालिकेत तक्रारपेटीच नाही, नागरिकांच्‍या तक्रारीवर सामाजिक माध्‍यमांवरही प्रतिसाद नाही !

नागपूर महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार !

नागपूर – एकीकडे ‘स्‍मार्ट सिटी’ म्‍हणून नागपूरचा उल्लेख केला जात आहे, तर दुसरीकडे नागरिकांच्‍या मूलभूत समस्‍या सोडवण्‍यातही नागपूर महानगरपालिका अपयशी ठरत आहे. नागरिकांसाठी महापालिका मुख्‍यालयात तक्रारपेटीही नाही. तरीही ‘सामाजिक माध्‍यमांवर किंवा ‘ऑनलाईन’ तक्रार करा’, असा समुपदेश देण्‍यात येतो; मात्र सामान्‍यांच्‍या तक्रारींची नोंद घेतली जात नाही.

१. गेल्‍या वर्षभरापासून महापालिकेवर ‘प्रशासक राज’ आहे. ‘जी २०’ बैठकीसाठी शहराच्‍या सौंदर्यीकरणावर लाखो रुपये व्‍यय करून खासगी एजन्‍सींना काम दिले जात आहे, तसेच ‘स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२३’ मध्‍येही क्रमांक मिळवण्‍यासाठी महापालिका प्रशासनाकडून तारेवरची कसरत करण्‍यात येत आहे; मात्र नागपूरकरांना भेडसावणार्‍या खर्‍या समस्‍यांवर काहीच केलेले दिसत नाही.

२. नियमानुसार प्रत्‍येक शासकीय कार्यालयात दर्शनी भागात नागरिकांसाठी तक्रार पेटी असणे आवश्‍यक आहे; मात्र महापालिका आयुक्‍त आणि प्रशासक बसत असलेल्‍या नागपूर महानगरपालिकेच्‍या मुख्‍यालयातच ही पेटी अस्‍तित्‍वात नाही.

३. महापालिकेतील इतर विभागांच्‍या स्‍थितीविषयी विचार न केलेलाच बरा. दुसरीकडे तक्रार घेऊन येणार्‍या नागरिकांना आवक-जावक विभागात पाठवण्‍यात येते, तसेच त्‍या ठिकाणाहून पोचपावती घेण्‍याचा समुपदेश दिला जातो.

४. शिवाय महापालिका आयुक्‍तांकडे कुणी नागरिक तक्रार घेऊन आल्‍यास त्‍याला चिटकवलेले ‘सोशल मीडिया हँडल’चे बारकोड दाखवून तेथे तक्रार करा, असा समुपदेश दिला जातो आणि त्‍यामुळे नागरिकांना तत्‍पर प्रतिसाद न मिळता आल्‍या पावली परतावे लागते.

५. नागपूरकरांनी केलेल्‍या ऑनलाईन तक्रारीवरही निवडक तक्रारी सोडवून महापालिका सामाजिक माध्‍यमांवर तशी पोस्‍ट टाकून स्‍वतःची पाठ थोपटवून घेण्‍याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

संपादकीय भूमिका

नागरिकांच्‍या तक्रारींची नोंद न घेणारे अकार्यक्षम महापालिका प्रशासन बरखास्‍त करणे योग्‍य नव्‍हे का ?