चीनने १२ देशांत हेरगिरी केली !

अमेरिकी गुप्तचर विभागाची माहिती

भारतातही हेरगिरी केल्याचा दावा

वॉशिंग्टन – चीनने मागील काही वर्षांपासून ५ खंडांतील १२ देशांवर हेरगिरी करणारे ‘बलून’ पाठवल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिली आहे. विविध देशांमध्ये असे ‘बलून’ पाठवणे, हा चीनच्या हेरगिरी कार्यक्रमाचा भाग आहे. असे ‘बलून’ पाठवून चीनने भारतातही हेरगिरी केल्याचे अमेरिकी अधिकार्‍यांनी म्हटले आहे. चीनने अशा ‘बलून’द्वारे जपान, तैवान आणि फिलिपाइन्स या देशांच्या हवाई हद्दीतही घुसखोरी केली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने ५ फेब्रुवारी या दिवशी हेरगिरी करणारा चिनी ‘बलून’ पाडला होता. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने याविषयीची माहिती प्रसारित केली आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने म्हटले आहे की,

१. चीन अशा ‘बलून’द्वारे जगभरातील देशांच्या सैन्य ठिकाणांवर पाळत ठेवत आहे. चीन दक्षिण अमेरिका, दक्षिण पूर्व आशिया, पूर्व आशिया आणि युरोप या खंडांमध्येही चीनने हेरगिरी करणारे ‘बलून’ पाठवले आहेत.

२. जगभरात चीनच्या वाढत्या हेरगिरीमुळे अमेरिकेने मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत अमेरिकेचे विदेशात असलेले अधिकारी त्या देशांना चीनच्या हेरगिरीची माहिती देतील. भारतही या मोहिमेत सहभागी होणार आहे.

३. अनेक वर्षांपासून चीन हेरगिरी करणार्‍या ‘बलून’वर संशोधन करत आहे. वर्ष २०२१ मध्ये चिनी वृत्तपत्राने हेरगिरी करणार्‍या ‘बलून’चे वर्णन ‘आकाशातील शक्तीशाली डोळे’, असे केले होते.

४. अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएचे माजी अधिकारी जॉन कल्व्हर यांनी सांगितले की, हेरगिरी करणारे बलून चीनमधील हेरगिरी उपग्रहांची कमतरता भरून काढत आहेत. हे बलून संबंधित देशातील वातावरणाची स्थिती आणि अंतराळातील माहिती सहज गोळा करू शकतात. चीनच्या सैन्यासाठी ही माहिती महत्त्वाची असते. याद्वारे युद्धाच्या वेळी अचूक लक्ष्य निश्चित करणे चीनला सोपे जाणार आहे.

संपादकीय भूमिका 

चीनच्या वाढत्या कुरापती या जागतिक शांततेसाठी धोकादायक ठरल्या आहेत. हे लक्षात घेऊन भारताने अधिकाधिक युद्धसज्ज होणे आवश्यक आहे !