भूकंपानंतर जनतेला आमच्याकडून म्हणावे तसे साहाय्य झाले नाही ! – राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची स्वीकृती

मृतांची संख्या १५ सहस्रांहून अधिक

तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन

अंकारा (तुर्कीये) – तुर्कीये आणि सीरिया येथील भूकंपामध्ये आतापर्यंत १५ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ४० सहस्रांहून अधिक लोक घायाळ झाले आहेत. सीरियामध्ये ३ लाखांहून अधिक जण बेघर झाले आहेत. जगभरातील ७० हून अधिक देश साहाय्यसाठी पुढे आले असतांना तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी मान्य केले, ‘भूकंपानंतर प्रारंभी आमच्याकडून म्हणावे तसे साहाय्य झाले नाही.’ भूकंपानंतर अनेक भागांतील लोकांनी साहाय्यकार्य विलंबाने पोचणे, तसेच साहाय्य साहित्य वेळेवर न मिळाल्याच्या तक्रारी केल्या होत्या. सरकारने दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर एर्दाेगन यांनी वरील चूक मान्य केली. एर्दोगन म्हणाले की, सरकार सर्व लोकांना साहाय्य करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. देशात कुणीही बेघर रहाणार नाही.

भारताचे १० नागरिक तुर्कीयेत अडकले !

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, तुर्कीयेमध्ये भूकंपानंतर एक भारतीय नागरिक बेपत्ता आहे. तसेच १० भारतीय तुर्कीयेच्या दुर्गम भागांत अडकले आहेत. त्यांच्या सुटकेचे प्रयत्न चालू आहेत.

तुर्कीयेमध्ये ट्विटर केले बंद !

तुर्कीयेमध्ये ट्विटर बंद करण्यात आले आहे. तुर्कीये सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सामाजिक माध्यमांवरून होणार्‍या अपप्रचाराच्या विरोधात विधेयक संमत केले होते.

भूकंपामुळे तुर्कीये १० फूट पुढे सरकले !

तुर्कीये भूगर्भामधील ३ टेक्टोनिक प्लेट्सच्या मध्ये वसलेले आहे. या प्लेट्स म्हणजे अनाटोलियन टेक्टोनिक, युरेशियन आणि अरेबियन प्लेट. तज्ञांच्या मते, ॲनाटोलियन टेक्टोनिक प्लेट आणि अरेबियन प्लेट एकमेकांपासून २२५ किलोमीटर दूर सरकल्या आहेत. त्यामुळे तुर्कीये त्याच्या भौगोलिक ठिकाणापासून १० फूट सरकले आहे.

इटलीचे भूकंपशास्त्रज्ञ डॉ. कार्लो डोग्लिओनी यांनी सांगितले की, टेक्टोनिक प्लेट्समधील या पालटामुळे तुर्कीये सीरियापेक्षा सुमारे २० फूट अधिक बुडाले असावे.