सरकारने इस्‍लामी जिहादच्‍या विरोधात इस्रायलप्रमाणे युद्ध पुकारावे ! – प्रवीण तोगाडिया, अध्‍यक्ष, आंतरराष्‍ट्रीय हिदु परिषद

देशात ‘लक्ष्यित हत्‍या’ वाढत असल्‍याचा आरोप

प्रवीण तोगाडिया

अमरावती – काश्‍मीरपर्यंत मर्यादित असलेल्‍या ‘लक्ष्यित हत्‍या’ आता देशभरात वाढत आहेत. ते पहाता केंद्र आणि राज्‍य सरकारने इस्‍लामी जिहादी आतंकवादाच्‍या विरोधात इस्रायलप्रमाणे युद्ध पुकारावे. यासाठी सेनादल आणि गुप्‍तचर संस्‍था यांसह पोलिसांना प्रशिक्षण देऊन एकत्रितपणे योजना सिद्ध करावी, अन्‍यथा देशातील प्रत्‍येक गावात उमेश कोल्‍हे, कन्‍हैया, हर्ष, किसन बरवा यांच्‍यासारख्‍या हिंदूंच्‍या हत्‍या होतील, अशी चिंता आंतरराष्‍ट्रीय हिंदु परिषदेचे अध्‍यक्ष प्रवीण तोगाडिया यांनी येथे ७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता आयोजित केलेल्‍या पत्रकार परिषदेत व्‍यक्‍त केली.

हिंदूंना जातींमध्‍ये विभाजित करण्‍याचे काम आता होऊ नये !

प्रवीण तोगाडिया म्‍हणाले, ‘‘सौदी अरेबियाने ‘आतंकवादाचे द्वार’ म्‍हणून तबलिगी जमातवर बंदी घातली आहे. मग केंद्र आणि राज्‍य सरकार या विरोधात कठोर पावले का उचलत नाही ? देशातील प्रत्‍येक गाव जिहाद्यांचे लक्ष्य होऊ शकते, याची भीती वाटते. आपल्‍याला पुढे जायचे आहे. त्‍यामुळे जुन्‍या जखमांच्‍या खपल्‍या काढू नयेत’, अशी मी विनंती करतो. हिंदु समाज आता एक झाला असून त्‍यामुळेच अयोध्‍या येथे श्रीराममंदिर साकार होत आहे. भाजप देशात सत्तेवर आला आहे. हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांमध्‍ये फूट पडलेली नाही. हिंदूंना जातींमध्‍ये विभाजित करण्‍याचे काम आता होऊ नये.’’

हिंदूंच्‍या तोंडाला कुलूप लावणार्‍या कायद्यांमध्‍ये पालट करावा !

‘‘भारतीय नोटांवर आधी हिरवा रंग होता; परंतु आता भगवा रंग वाढला आहे. जो काही हिरवा रंग शिल्लक आहे, तोही लवकरच निघून जाईल. हिंदु हा मवाळ आणि सहनशील असला, तरी राक्षसांचा विरोध करण्‍याची वैदिक काळापासून परंपरा राहिली आहे. यासाठीच हिंदूंच्‍या तोंडाला कुलूप लावणार्‍या कायद्यांमध्‍ये पालट करण्‍यात यावा. जिहादी कारवायांवर वचक बसण्‍यासाठी केंद्र सरकारने सर्वप्रथम लोकसंख्‍या नियंत्रण कायदा लागू करावा. ज्‍याप्रमाणे श्रीराममंदिराच्‍या निर्मितीसाठी संसदेत कायदा पारित करण्‍यात आला, त्‍याचप्रमाणे काशी विश्‍वनाथ मंदिर आणि मथुरा येथील श्रीकृष्‍णाचे मंदिर उभारण्‍यासाठी कायदा सिद्ध करावा’’, असे आवाहनही प्रवीण तोगाडिया यांनी केले.

राजकारणाचे हिंदुकरण झाल्‍याचे नेत्‍यांना कळले !

ते म्‍हणाले, ‘‘हिंदु मंदिरांशी ज्‍यांचा आतापर्यंत दूरवर संबंध नव्‍हता, असे राजकीय नेते जसे राहुल गांधी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल हे मंदिराकडे वळले आहेत. एव्‍हाना त्‍यांना राजकारणाचे हिंदुकरण झाल्‍याचे कळले आहे. त्‍यामुळे प्रत्‍येक जण हिंदु मंदिरात दर्शनासाठी जात आहेत.’’