कर्तृत्‍व आणि दातृत्‍व यांचा संगम असणारे अन् ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेले ‘पितांबरी उद्योग समुहा’चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६० वर्षे) !

४.२.२०२३ या दिवशी ठाणे येथील पितांबरी उद्योग समुहाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांचा ६० वा वाढदिवस आहे. स्‍वत:मधील अनेक गुणांच्‍या आधारे त्‍यांनी व्‍यवसायात वृद्धी करून भरभराट आणली. वाढदिवसानिमित्त त्‍यांच्‍या नातेवाइकांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ६० व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्‍छा !

श्री. रवींद्र प्रभुदेसाई

‘उद्योग महर्षि’ ही उपाधी सर्वार्थांनी सार्थ करणारे श्री. रवींद्र प्रभुदेसाई !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

षष्‍ठ्यब्‍दपूर्तीनिमित्त श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना अनेकानेक शुभेच्‍छा !

संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्‍हटले आहे,

जोडोनियां धन उत्तम वेव्‍हारें । उदास विचारें वेच करी ॥ 
उत्तमचि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥

– तुकाराम गाथा, अभंग २८५४, ओवी  १ आणि २

अर्थ : जो मनुष्‍य उत्तम उद्योग करून धन मिळवतो आणि त्‍याचा विनियोग चांगल्‍या प्रकारे करतो, त्‍याच मनुष्‍याला उत्तम गती मिळते अन् उत्तम सुखोपभोगांची प्राप्‍ती होते.

संत तुकाराम महाराजांच्‍या अभंगातील या दोन ओळींमध्‍येच श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांचे जीवनचरित्र सामावले आहे. प्रत्‍येक माता-पित्‍याला ‘आपला पुत्र कर्तृत्‍ववान व्‍हावा’, असे वाटते; पण श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांचे वडील कैलासवासी वामनराव प्रभुदेसाई आणि आई पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई या उभयतांची ‘आपला पुत्र धर्मपुत्र व्‍हावा’, अशी इच्‍छा होती आणि ती ईश्‍वरी कृपेने पूर्णही झाली. ऐहिक कर्तृत्‍व आणि परमार्थिक उन्‍नती यांचा सुरेख संगम श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्‍या ठायी झाला आहे, हे आपण नेहमीच अनुभवतो.

भारतीय, म्‍हणजेच हिंदु संस्‍कृतीत ज्ञान म्‍हणजे परिपूर्ण सत्‍याचे आत्‍मज्ञान आणि साधना यांच्‍या उच्‍च स्‍तरावर पोचलेल्‍या व्‍यक्‍तीला ‘महर्षि’ संबोधले जाते.

वर्ष २०१५ मध्‍ये वयाच्‍या ५२ व्‍या वर्षी श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के असल्‍याचे, म्‍हणजेच जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त झाले असल्‍याचे सनातन संस्‍थेने घोषित केले होते. उद्योग क्षेत्रात राहूनही श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी ६० टक्‍क्‍यांहून अधिक आध्‍यात्मिक पातळी गाठणे, हे दुर्मिळ आणि सर्वच उद्योगपतींसाठी आदर्शवत् आहे. त्‍यामुळे श्री. रवींद्र प्रभुदेसाई हे खर्‍या अर्थाने ‘उद्योग महर्षि’ आहेत. त्‍यांनी शुद्ध हेतूने आणि सचोटीने व्‍यापार केलाच; पण मिळालेल्‍या धनाच्‍या भोगात न रमता त्‍यांनी धर्मकार्य करणार्‍या अनेक संस्‍थांना सढळ हस्‍ते दान केले. देवऋण, ऋषिऋण आणि समाजऋण फेडण्‍याचे याहून उत्तम उदाहरण कोणते असेल ?

श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी साधनेस आरंभ केल्‍यानंतर ‘पितांबरी उद्योग समूह’ हा केवळ त्‍यांच्‍या अर्थार्जनाचाच नव्‍हे, तर समाजाची आध्‍यात्मिक प्रगती करणार्‍या समष्‍टी साधनेचा मार्ग बनला. म्‍हणजे व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधनेची सुंदर सांगड घालत पितांबरी उद्योग समूहातील सर्वच, म्‍हणजे कर्मचारी, वितरक, व्‍यवस्‍थापनातील अधिकारी अशा पितांबरी समुहाशी संबंधित सर्वच घटकांना साधनेचा मार्ग दाखवला. इतकेच नव्‍हे, तर ‘पितांबरीच्‍या ग्राहकांनाही साधनेचे महत्त्व समजले पाहिजे’, या तळमळीपोटी त्‍यांनी उत्‍पादनांच्‍या वेष्‍टनावर साधनेचे महत्त्व सांगणारा मजकूर छापला. ज्‍याप्रमाणे कुटुंबवत्‍सल पिता आपल्‍या कुटुंबावर सुसंस्‍कार करतो, त्‍याचप्रमाणे त्‍यांनी पितांबरी समुहातील सर्वच घटकांवर साधनेचे संस्‍कार केले.

श्री. प्रभुदेसाई यांच्‍या या यशस्‍वी जीवनामध्‍ये त्‍यांची पत्नी सौ. वृषाली प्रभुदेसाई यांची मोलाची साथ आहे. उभयतांनी केलेल्‍या संस्‍कारांमुळे त्‍यांचा मुलगा श्री. परिक्षित आणि मुलगी कु. प्रियांका त्‍यांचा व्‍यावसायिक आणि आध्‍यात्मिक वारसा पुढे चालवत आहेत.

श्री. रवींद्र प्रभुदेसाई त्‍यांच्‍या वडिलांच्‍या पावलांवर पाऊल ठेवून यशस्‍वी उद्योगपती बनले. आता त्‍यांच्‍या मातोश्री पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई यांच्‍या पावलांवर पाऊल ठेवून त्‍यांनी शीघ्रतेने संतत्‍वाकडे वाटचाल करावी, ही या शुभदिनी श्री गुरुचरणी प्रार्थना !

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (३.२.२०२३)


सौ. मेधा मुकुंद देवधर (श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांंची मोठी बहीण)

सौ. मेधा देवधर

१. स्‍वीकारण्‍याची वृत्ती : ‘रवि कुठलीही परिस्‍थिती लगेच स्‍वीकारू शकतो. कुणी त्‍याला फसवले किंवा त्‍याची धंद्यात हानी झाली, तरी तो त्‍या प्रत्‍येक गोष्‍टीकडे आध्‍यात्मिक दृष्‍टीकोनातून बघतो. त्‍याला कुणी फसवले, तर तो ‘यातून आपले देवाणघेवाण हिशोब फिटत आहेत’, असा विचार करतो. धंद्यात हानी झाली, तरी खचून न जाता तो त्‍यातून मार्ग काढतो.

२. क्षमाशील : इतरांकडून चुका झाल्‍या, तरी रवि सहसा चिडत नाही. तो चुकलेल्‍या व्‍यक्‍तीला समजावून सांगून तिला पुन्‍हा संधीही देतो.

३. परात्‍पर गुरुदेवांप्रतीचा भाव : ‘पितांबरी आस्‍थापना’त जे नवीन उत्‍पादन बनते, ते तो परात्‍पर गुरुदेवांच्‍या चरणी अर्पण करतो.

४. त्‍यानेच आम्‍हा सर्वांना साधनेला लावून गुरुचरणांपर्यंत पोचवले आहे.

५. परात्‍पर गुरुदेवांची श्री. रवींद्र यांच्‍यावर असलेली अपार कृपा ! : गुरुदेवांची त्‍याच्‍यावर अपरिमित प्रीती आणि कृपा आहे. तेच त्‍याला पितांबरी उद्योग सर्व संकटातून तारून नेण्‍यासाठी बुद्धी देतात; किंबहुना ‘तेच हे सर्व आमच्‍यासाठी करतात’, असे मला वाटते.

‘गुरुदेवांची अशीच कृपा आम्‍हा सर्वांवर सदैव राहू दे. गुरुदेवांनी रवीला दिलेल्‍या आशीर्वादानुसार लवकरच त्‍याची उन्‍नती होऊन तो ‘उद्योगमहर्षि’ म्‍हणून प्रसिद्ध होऊ दे’, अशी गुरुमाऊलीच्‍या चरणी प्रार्थना !’


श्री. मुकुंद सखाराम देवधर (श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांचे भावोजी (बहिणीचे पती), वय ६९ वर्षे), ठाणे

‘श्री. रवींद्र हा नात्‍याने माझा मेहुणा असला, तरी प्रत्‍यक्षात तो माझा लहान भाऊ आणि मित्र आहे. ‘महाविद्यालयीन विद्यार्थी ते एक यशस्‍वी उद्योजक’, या  त्‍याच्‍या प्रदीर्घ प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. या प्रदीर्घ प्रवासाची कथा पुष्‍कळच अलौकिक आहे. या प्रवासात पुष्‍कळ चढ-उतार आहेत, खाच-खळगे आहेत, लहान-मोठी वळणे आहेत, तर काही वेळा हा प्रवास दर्‍या-खोर्‍यांतून झालेला आहे. या सगळ्‍या प्रवासाचे शब्‍दांकन करणे फार कठीण आहे.

श्री. मुकुंद देवधर

१. रवींद्र अत्‍यंत सौम्‍य प्रकृतीचा आहे. ‘तो काही प्रमाणात भोळा आहे’, असे म्‍हटले, तरी चालेल.

२.  तो रीती-रिवाज पाळणारा, मोठ्यांचा आदर राखणारा आणि नाती-गोती जपणारा आहे.

३ इ. आई-वडिलांचे आशीर्वाद आणि गुरूंचे मार्गदर्शन मिळणे : रवींद्रला आयुष्‍याच्‍या प्रवासात त्‍याच्‍या आई-वडिलांचे आशीर्वाद मिळाले. त्‍याच वेळी त्‍याला गुरूंचेही मार्गदर्शन मिळाले. रवींद्रने स्‍वतःला गुरूंच्‍या मार्गदर्शनानुसार घडवले. उच्‍चतम संस्‍कार आणि नीतीमत्ता या संस्‍कारांनी रवीला संपन्‍नता आली.

३ ई. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या भेटीनंतर साधनेची दिशा प्राप्‍त होणे : या प्रवासाच्‍या एका महत्त्वाच्‍या वळणावर त्‍याची परमेश्‍वरस्‍वरूप परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्‍याशी भेट झाली. त्‍यानंतर रवींद्रच्‍या उच्‍च संस्‍कारित आयुष्‍याला संपन्‍नता आली आणि त्‍याला साधनेची दिशा प्राप्‍त झाली. त्‍यामुळेच रवींद्र यश आणि अपयश सहज पचवून साधनेच्‍या मार्गावर स्‍थिर आहे.

३ उ. तळागाळातील माणसांना साहाय्‍य करण्‍यास तत्‍पर ! : रवि सामाजिक बांधिलकीची जाण ठेवणारा आहे. तो तळागाळातील माणसांना साहाय्‍य करण्‍यास सदैव तत्‍पर असतो. रवीसारखी व्‍यक्‍तीमत्त्वे समाजात विरळाच आहेत; म्‍हणूनच ती आपल्‍या सगळ्‍यांनाच हवीशी वाटतात.

‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपाशीर्वादाने रवीला उदंड आयुष्‍य लाभो’, अशी मी प्रार्थना करतो.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ३१.१.२०२३)


सौ. भक्‍ती प्रमोद गैलाड (श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांंची धाकटी बहीण, वय ५८ वर्षे), ठाणे

सौ. भक्‍ती गैलाड

१. श्री. रवींद्र यांचा सनातन संस्‍थेशी झालेला संपर्क आणि साधनेला आरंभ

१ अ. व्‍यवसायात हानी झाल्‍याने निराश होणे आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग ऐकून निराशेतून बाहेर पडणे : ‘रविदादाची व्‍यवसायामध्‍ये काही कारणाने हानी झाली होती. त्‍यामुळे काहीशा विमनस्‍क मनःस्‍थितीत तो ठाण्‍याच्‍या आर्य क्रीडा मंडळाच्‍या मैदानातून जात असतांना त्‍याला परात्‍पर गुरुदेवांचा सत्‍संग चालू असलेला दिसला. तो त्‍या सत्‍संगाला जाऊन बसला. त्‍या सत्‍संगामुळे त्‍याला निराशेच्‍या अवस्‍थेतून बाहेर पडायला साहाय्‍य झाले. त्‍यानंतर तोे नियमित सत्‍संगाला जाऊ लागला. त्‍याच्‍यामुळे हळूहळू आमचे सर्व कुटुंब सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनाखाली साधना करू लागले.

२. श्री. रवींद्र यांचे वैशिष्‍ट्यपूर्ण गुण !

२ अ. वातावरण आनंदी आणि हलके ठेवणे : रविदादा आजूबाजूचे वातावरण नेहमी आनंदी ठेवण्‍याचा प्रयत्न करतो. तो हलकेफुलके विनोद सांगून सर्वांना आनंदी ठेवतो आणि ‘सर्वांना मनमोकळेपणाने बोलता येईल’, असे वातावरण निर्माण करतो.

२ आ. कुटुंबियांचा आधारस्‍तंभ : रविदादा नातेवाइकांना येणार्‍या अडचणींमध्‍येही सतत साहाय्‍य करतो. त्‍यामुळे सवर्र् कुटुंबियांना त्‍याचा आधार वाटतो.

२ इ. कुटुंबियांनी साहाय्‍य करणे : रविदादाचे घर मोठे असल्‍यामुळे आमचे सर्व कार्यक्रम त्‍याच्‍या घरीच होतात आणि त्‍यामध्‍ये रविदादाची मुले प्रियांका आणि परीक्षित अन् स्नुषा सौ. प्रिया हे सर्व जण आनंदाने सहभागी होतात. रविदादाला संसारात सौ. वृषालीवहिनींची (पत्नीची) समर्थ साथ आहे. ‘कुणाला किती साहाय्‍य केले ? काय दिले ?’, असे कुठलेेही प्रश्‍न तिच्‍या मनात येत नाहीत.

२ ई. सत्‍कार्यासाठी सढळ हस्‍ते दानधर्म करणे : तो त्‍याला मिळालेल्‍या धनाचा उपयोग राष्‍ट्ररक्षण आणि धर्मजागृती या कार्यासाठी करतो. त्‍याला व्‍यवसायामध्‍ये होत असलेल्‍या लाभाचा काही टक्‍के भाग तो राष्‍ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करणार्‍या संस्‍थांना अर्पण करतो. त्‍याचप्रमाणे समाजामध्‍ये सांस्‍कृतिक आणि सामाजिक काम करणार्‍यांनाही तो सढळ हस्‍ते साहाय्‍य करतो.

२ उ. रविदादा गावाला जातांना आणि गावाहून परत आल्‍यावर पू. आईंना (सनातनच्‍या ४९ व्‍या संत पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई यांना) नमस्‍कार करून त्‍यांचे आशीर्वाद घेतो.

३. तो सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सान्‍निध्‍य अनुभवतो.

परात्‍पर गुरुदेवांनी साधनेविषयी जे अनमोल मार्गदर्शन केले, ते गुरुदेवांच्‍या कृपेमुळे त्‍याने कृतीत आणले. ‘गुरुदेवांच्‍या कृपेमुळे आम्‍हाला असा भाऊ लाभला’, याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते. ‘वयाची साठी (६० वर्षे) पूर्ण केल्‍याच्‍या निमित्ताने रविदादा साधनेचा पुढचा टप्‍पा गाठू दे’, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते.’


राष्‍ट्र आणि धर्म कार्यात भरीव योगदान देणारे श्री. रवींद्र प्रभुदेसाई !

श्री. सतीश कोचरेकर

१. उत्‍साह आणि उत्तम कार्यक्षमता

‘वयाची ६० वर्षे पूर्ण करत असतांना आजही श्री. प्रभुदेसाई यांचा उत्‍साह तरुणांना लाजवणारा आहे. प्रत्‍येक क्षणाचा ते पुरेपूर उपयोग करतात. व्‍यस्‍त दिनक्रम असल्‍यानंतर इतरांना थोडा थकवा जाणवतो; पण श्री. प्रभुदेसाई मात्र अत्‍यंत उत्‍साही असतात. त्‍यांची साधना आणि चैतन्‍य यांमुळेच त्‍यांच्‍यात उत्‍साह अन् कार्यक्षमता आहे.

२. सांस्‍कृतिक समितीच्‍या माध्‍यमातून कार्यक्रम राबवणे

श्री. प्रभुदेसाई यांनी पितांबरी आस्‍थापनामध्‍ये ‘सांस्‍कृतिक समिती’ची स्‍थापना केली आहे. या समितीच्‍या माध्‍यमातून गुढीपाडव्‍यापासून दिवाळीपर्यंत वर्षभर विविध सण उत्‍साहाने साजरे करून कार्यक्रम आयोजित केले जातात, उदा. सर्वांना गणेशोत्‍सवात मोदक आणि श्रीकृष्‍णजन्‍माष्‍टमीला दहीपोहे प्रसाद म्‍हणून देणे, मकरसंक्रांतीला तीळगूळ वाटणे. हिंदु संस्‍कृतीशी निगडित कार्यक्रमांमुळे आस्‍थापनात उत्‍साहाचे वातावरण निर्माण होते. २६ जानेवारीला प्राचीन शिवकालीन शस्‍त्रांचे, उदा. तलवार, भाले इत्‍यादींचे प्रदर्शन आयोजित करण्‍यात येते.

३. पितांबरी आस्‍थापनाची दैनंदिनी गुढीपाडव्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रकाशित करणे

बहुतेक सर्व आस्‍थापने त्‍यांची दैनंदिनी इंग्रजी नववर्षाला, म्‍हणजेच १ जानेवारीला प्रकाशित करतात; परंतु पितांबरी आस्‍थापनाची दैनंदिनी हिंदु नववर्षाच्‍या, म्‍हणजेच गुढीपाडव्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रकाशित केली जाते. विविध लेखांसह या दैनंदिनीत सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सद़्‍गुरु आणि संत यांचा आशीर्वादपर संदेश नियमित प्रसिद्ध केला जातो.

४. आस्‍थापनात राष्‍ट्र, धर्म आणि अध्‍यात्‍म या विषयांवरील ग्रंथ असलेले वाचनालय उपलब्‍ध करणे

श्री. प्रभुदेसाई यांचे वाचन अफाट आहे. त्‍यांनी राष्‍ट्र, धर्म, भारतीय इतिहास यांविषयीची, तसेच प्रेरणादायी विचार, अशा प्रकारची सहस्रो पुस्‍तके वाचली आहेत. त्‍यानुसार त्‍यांनी अनेक गोष्‍टी यशस्‍वीरित्‍या आचरणातही आणल्‍या आहेत. ‘सर्वांनाच या ग्रंथसंपदेचा लाभ व्‍हावा’, यासाठी त्‍यांनी पितांबरीच्‍या कार्यालयात वाचनालय चालू केले. सनातन संस्‍थेचे सर्व ग्रंथ वाचनालयात उपलब्‍ध आहेत. अनेक वेळा श्री. प्रभुदेसाई आस्‍थापनातील सहकार्‍यांना त्‍यांच्‍या आवडीचे ग्रंथ भेट देतात.

५. राष्‍ट्र, धर्म आणि अध्‍यात्‍म यांविषयीच्‍या कार्यक्रमांना प्रायोजकत्‍व देणे

राष्‍ट्र, धर्म आणि अध्‍यात्‍म यांच्‍याशी संबंधित कार्यक्रमांना प्रायोजकत्‍व देण्‍यासाठी ते  प्राधान्‍य देतात. यामागे ‘समाजात असे कार्यक्रम व्‍हावेत आणि आयोजकांना प्रोत्‍साहन मिळावे’, हा उद्देश असतो. ‘आपण समाजाचे देणे लागतो’, हा विचार ते सर्वांसमोर मांडून कृतीही करतात.

६. संतांचे आज्ञापालन करणे

परात्‍पर गुरु पांडे महाराज यांनी श्री. प्रभुदेसाई यांना त्‍यांच्‍या एका भेटीत गोपालनाचे महत्त्व सांगितले. त्‍यानंतर त्‍यांनी ‘पितांबरी’च्‍या महाराष्‍ट्रातील विविध कारखान्‍यांच्‍या ठिकाणी गोपालनाची व्‍यवस्‍था केली. दीपावलीच्‍या कालावधीत वसुबारसच्‍या दिवशी श्री. प्रभुदेसाई सहकुटुंब गोवत्‍सपूजनासाठी भिवंडी येथे असलेल्‍या पितांबरीच्‍या वास्‍तूंमध्‍ये जातात.

 ७. विविध कार्यक्रमांत सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याविषयी सांगून साधनेचे महत्त्व अधोरेखित करणे

श्री. प्रभुदेसाई मार्गदर्शन करतांना ते सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याविषयी कृतज्ञताभावाने सांगतात, तसेच त्‍यांना साधना केल्‍यामुळे झालेले व्‍यक्‍तीगत आणि व्‍यावसायिक लाभ सांगतात. श्री. प्रभुदेसाई सर्वांना आस्‍थापनाच्‍या अंतर्गत कार्यक्रमांतही विविध उदाहरणे देऊन साधनेसाठी उद्युक्‍त करतात.

८. विविध कर्तव्‍ये एकाच वेळी आणि सक्षमपणे पार पाडणे

आज विविध क्षेत्रांत पितांबरीचा व्‍यवसाय वृद्धींगत होण्‍यामागे श्री. प्रभुदेसाई यांचे अविरत प्रयत्न कारणीभूत आहेत.  ‘कुटुंबीय, नातेवाईक, स्नेही, समाज, राष्‍ट्र आणि धर्म, या सर्वांशी संबंधित विविध कर्तव्‍ये एकाच वेळी अन् सक्षमपणे पार पाडणे’, हे प्रत्‍येकालाच जमते, असे नाही; पण श्री. प्रभुदेसाई यांनी हे सगळे लीलया करून दाखवले आहे. ‘ऐहिक गोष्‍टी प्राप्‍त करतांना साधनेतसुद्धा समांतर प्रगती करणे’, हेश्री. प्रभुदेसाई यांच्‍या व्‍यक्‍तीमत्त्वातील वेगळेपण दर्शवते.

‘कर्तृत्‍व आणि दातृत्‍व यांचा सुरेख संगम असलेल्‍या श्री. प्रभुदेसाई यांची उत्तरोत्तर प्रगती होवो आणि संतांच्‍या आशीर्वादानुसार ते ‘उद्योग महर्षी’ या पदावर आरूढ होवोत’, अशी सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्‍या चरणी प्रार्थना करतो.’

– श्री. सतीश कोचरेकर, देवद, पनवेल. (३१.१.२०२३)


सहकार्‍यांनाही साधनेला उद्युक्‍त करणारे श्री. रवींद्र प्रभुदेसाई !

श्रीमती स्मिता नवलकर

 १. सनातनशी संपर्क आणि साधना

‘श्री. रवींद्र प्रभुदेसाई मागील २४ वर्षांपासून त्‍यांच्‍या कुटुंबियांसह सनातन संस्‍थेशी जोडलेलेे आहेत. सनातन संस्‍थेच्‍या संपर्कात आल्‍यावर त्‍यांनी आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांनी साधनेेला आरंभ केला. त्‍यांच्‍या मातोश्री पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई (वय ८७ वर्षे, सनातनच्‍या ४९ व्‍या संत) संतपदाला पोचल्‍या आहेत.

२. आस्‍थापनातील सहकार्‍यांसाठी सत्‍संग चालू करणे

त्‍यांनी त्‍यांच्‍या देशभरातील आस्‍थापनातील शाखांच्‍या सहकार्‍यांसाठी सत्‍संग चालू केले. (ते कर्मचार्‍यांना ‘कर्मचारी’ न म्‍हणता ‘सहकारी’, असे संबोधतात.) आधी तेथे सनातनचे साधक सत्‍संग घेत असत; पण कार्यालये आणि सहकारी यांची संख्‍या वाढल्‍यावर त्‍यांनी एका व्‍यक्‍तीची आध्‍यात्मिक व्‍यवस्‍थापक (स्‍पिरिच्‍युअल मॅनेजर) म्‍हणून नेमणूक केली आणि सहकार्‍यांसाठी नियमित सत्‍संग चालू केले. तेथे नियमित समष्‍टीसाठी प्रार्थना केल्‍या जातात.

३. समाजऋण आणि ऋषीऋण फेडणे

३ अ. सनातन संस्‍थेसारख्‍या अन्‍य संस्‍थांनाही धर्मकार्य आणि समाजकार्य यांत साहाय्‍य करून ते समाजऋण फेडत आहेत.

३ आ. स्‍वतःच्‍या गावाचा विकास केल्‍यामुळे तेथील स्‍थानिक मराठी लोकांना नोकर्‍या मिळणे : मागील २५ वर्षांत ‘पितांबरी उद्योग समुहा’ने पुष्‍कळ नवीन उत्‍पादने, सौरऊर्जा, आयुर्वेदीय औषधेे, नैसर्गिक शेती, पर्यटनस्‍थळ, असा विस्‍तार केला आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या तळवडे (तालुका राजापूर, जिल्‍हा रत्नागिरी) येथील गावी ऊस, तीळ, सुगंधी फुले, आयुर्वेदीय वनस्‍पती यांची लागवड करायला आरंभ केला आहे, तसेच तेलाचा घाणा चालू केला आहे. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मार्गदर्शनात सांगितल्‍याप्रमाणे ते हिंदु राष्‍ट्रातील आदर्श गावाची निर्मिती करत आहेत. त्‍यामुळे तेथील स्‍थानिक मराठी लोकांना नोकर्‍या मिळाल्‍या आणि गावाची प्रगती झाली.

३ इ. मराठी हिंदु पिढीला जागृत करून त्‍यांना नोकरीधंद्यासाठी उद्युक्‍त करणे आणि आस्‍थापनातील सहकार्‍यांना वेगळे प्रशिक्षण देऊन त्‍यांची प्रगती करून घेणे : आरंभापासून त्‍यांनी मराठी हिंदु पिढीला जागृत करून त्‍यांना नोकरीधंद्यासाठी उद्युक्‍त केले आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या आस्‍थापनातील सहकार्‍यांना वेगळे प्रशिक्षण देऊन त्‍यांची प्रगती करून घेतली. काही जणांना ‘एम्.बी.ए.’, ‘आय.टी’, कला आणि अन्‍य प्रशिक्षण देऊन त्‍यांनी त्‍यांची व्‍यावहारिक प्रगती करून घेतली. यासाठी त्‍यांचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. अन्‍य पंथीय लोक त्‍यांच्‍या पंथातील लोकांना प्रोत्‍साहित करतांना दिसतात; परंतु हिंदु उद्योजकांमध्‍ये हा भाग फारच अल्‍प आढळतो. श्री. प्रभुदेसाई हे करत आहेत, यासाठी त्‍यांचा अभिमान वाटतो.

३ ई. ते समाजात होणार्‍या कार्यक्रमांमध्‍ये आणि मित्रमंडळींमध्‍ये सनातन संस्‍था करत असलेले ‘समाजसाहाय्‍य, राष्‍ट्ररक्षण अन् धर्मजागृती’ या कार्याविषयी आवर्जून माहिती सांगतात. या माध्‍यमातून ते ‘ऋषीऋण’ फेडत आहेत.

४. कुटुंबियांनी व्‍यवसायात साहाय्‍य करणे

श्री. प्रभुदेसाई यांच्‍या यशामध्‍ये त्‍यांच्‍या पत्नी सौ. वृषालीताई यांचाही मोठा वाटा आहे. त्‍यांनी त्‍यांचा मुलगा परीक्षित आणि मुलगी प्रियांका यांच्‍यावरही चांगले संस्‍कार केले आहेत.श्री. परीक्षित वडिलांना व्‍यवसायात साहाय्‍य करत आहेत. त्‍यांची पत्नी सौ. प्रिया यासुद्धा त्‍यांना साहाय्‍य करतात.

५. व्‍यावसायिक प्रगतीचे श्रेय परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना देणे

श्री. प्रभुदेसाई साधना करत असल्‍यामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये साधकत्‍वाचे अनेक गुण आहेत, उदा. प्रेमभाव, संघटन, इतरांना समजून घेणे, इतरांचा विचार करणे, नियोजनकौशल्‍य इत्‍यादी. त्‍यांचे नियोजनकौशल्‍य अफाट आहे. उत्‍पादने, तसेच पितांबरी उद्योग समुहाच्‍या अनेक शाखा आणि सर्वत्रचे सहकारी यांच्‍याशी त्‍यांचा उत्तम समन्‍वय असतो. त्‍यांच्‍या या कौशल्‍याचे त्‍यांच्‍या सहकार्‍यांनाही आश्‍चर्य वाटते. याविषयी त्‍यांना विचारले असता ते म्‍हणतात, ‘‘सर्व गुरुदेवच करतात. मी त्‍यांचा सेवक म्‍हणून कारभार सांभाळतो.’’ त्‍यांचे हे बोल ऐकून माझी भावजागृती झाली.

६. (कै.) परात्‍पर गुरु पांडे महाराज यांच्‍या मार्गदर्शनाप्रमाणे कृती केल्‍यामुळे व्‍यावसायिक भरभराट होणे

एकदा (कै.) परात्‍पर गुरु पांडे महाराज यांनी श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना सांगितले, ‘‘ग्राहक म्‍हणजे देव. आपण देवाची सेवा करतो, त्‍याप्रमाणे ग्राहकांची सेवा करायला हवी. तुम्‍ही साधना केलीत, तर ग्राहकांच्‍या घरी प्रत्‍येक उत्‍पादनासह चैतन्‍य जाईल.’’ श्री. प्रभुदेसाई यांनी परात्‍पर गुरु पांडे महाराज यांच्‍या मार्गदर्शनानुसार कृती केल्‍यामुळे त्‍यांची भरभराट होत आहे.

७. जाणवलेले पालट

अ. श्री. प्रभुदेसाई यांचा चेहरा उत्‍साही आणि तेजस्‍वी वाटतो.

आ. त्‍यांच्‍या चेहर्‍यावरील तेज पाहून काही लोकांनी विचारले असता त्‍यांनी त्‍याचे श्रेय साधनेला आणि गुरुदेवांना दिले.’

– श्रीमती स्‍मिता नवलकर (आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍के, वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.१.२०२३)