महंमद पैगंबर आणि येशू यांचे पूर्वज सनातनी हिंदू !  

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांची स्पष्टोक्ती !

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

भुवनेश्‍वर (ओडिशा) – महंमद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज सनातनी हिंदू होते, अशी स्पष्टोक्ती ओडिशातील पुरी येथील पूर्वाम्नाय गोवर्धन पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे एका कार्यक्रमात केले. अमेरिकेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या संसदेत ‘महमंद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज सनातनी हिंदू होते’, असे सूत्र उपस्थित केले होते. त्याचेच उदाहरण देत शंकराचार्यांनी ही स्पष्टोक्ती केली आहे.

मंदिरे आणि मठ यांवर सरकारचे नियंत्रण नको !

शंकराचार्य पुढे म्हणाले की, हिंदूंची मंदिरे आणि मठ यांवर सरकारचे नियंत्रण असू नये. मंदिरांचा पैसा विकासकामांसाठी व्यय (खर्च) करण्याची आवश्यकता नाही.

जगन्नाथ पुरी येथील  मंदिरातील रत्नभांडारांच्या हरवलेल्या चाव्यांच्या संदर्भात मी हस्तक्षेप का करावा ?

जगन्नाथ पुरी येथील मंदिरात ७ रत्नभांडार आहेत. यांपैकी ४ भांडाराच्या चाव्या ३८ वर्षांपूर्वी अचानक हरवल्या आहेत. याविषयी प्रश्‍न विचारला असता शंकराचार्य  म्हणाले की, ओडिशा सरकार आणि जगन्नाथ मंदिर प्रशासन यांनी यासंदर्भात कुठलीही चर्चा केलेली नाही. रत्नभांडाराच्या प्रकरणांमध्ये मी हस्तक्षेप करावा का ?

पृथ्वी आणि पर्यावरण शुद्ध ठेवणे, हे आपले दायित्व !

जोशीमठातील भूस्खलनाविषयी विचारले असता शंकराचार्य म्हणाले की, पृथ्वी आणि पर्यावरण शुद्ध ठेवणे, हे आपले दायित्व आहे. ‘विकास’ हा शब्द आणि त्याभोवतीचा संदर्भ प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. पृथ्वी, पाणी आणि हवा हे उर्जेचे स्रोत आहेत. प्रत्येक ठिकाणी विकास करण्याची आवश्यकता नाही.

साडेतीन वर्षांत भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणार !

प्रयागराज येथील माघमेळ्यामध्ये शंकराचार्यांच्या मंडपात आयोजित हिंदु राष्ट्र अधिवेशनात शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद म्हणाले की, भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची चर्चा अमेरिकेच्या संसदेतही चालू आहे. अशा काही शक्ती आहेत, ज्या भारताला हिंदु राष्ट्र घोषित होऊ न देण्यासाठी कार्यरत आहेत. त्या कोण आहेत, हे मला ठाऊक आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, त्यांचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी साडेतीन वर्षांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. या काळात भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यात येईल.

संपादकीय भूमिका

ख्रिस्ती पंथ २ सहस्र, तर इस्लाम १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी स्थापन झाला आहे. सनातन धर्म पृथ्वीच्या उत्पत्तीपासून, म्हणजे लाखो वर्षांपासून अस्तित्वात असल्याने शंकराचार्य असे म्हणत असणार, हे लक्षात येते !