आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचे उद्घाटन महाराष्ट्रातील साधू, संत आणि महंत यांच्या हस्ते करणार ! – नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री

सातारा, २८ जानेवारी (वार्ता.) – आळंदी ते पंढरपूर हा १२ सहस्र कोटी रुपयांचा पालखी मार्ग येत्या ३ मासांत पूर्ण होईल. या मार्गावर वारकर्‍यांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पालखी मार्गाचे उद्घाटन लवकरच महाराष्ट्रातील साधू, संत आणि महंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

फलटण (जिल्हा सातारा) येथे विविध रस्तेकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, तसेच जिल्ह्यातील आमदार अन् विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मंत्री गडकरी पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील महामार्गाची लांबी वर्ष २०१४ पर्यंत ४९.०४ किलोमीटर एवढी होती. आता ती ८५८ किलोमीटर एवढी झाली आहे. पुणे-बेंगळुरू महामार्गावर विविध सुविधांसह औद्योगिक वसाहतींची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच शेतकर्‍यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळणार आहे. यामुळ दुष्काळी भागातील स्थलांतर अल्प होईल. महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी आहे. राज्यातील संतमंडळींचे वाङ्मय हे ‘डिजिटल’ पद्धतीने निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. कारखान्यांतून इथेनॉलची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्यास कारखान्यांना अधिकचा लाभ होईल. पेट्रोलहून इथेनॉल अधिक स्वस्त आहे. भविष्यात इथेनॉलवर चालणार्‍या वाहनांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीमध्ये पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले.