नवी मुंबई – सरकारचे माथाडी कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन’चे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी येथे व्यक्त केली. माथाडी भवन येथे युनियनच्या वतीने मुकादम-कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते.
नरेंद्र पाटील पुढे म्हणाले की, आम्ही अनेक वेळा माथाडी कामगारांच्या प्रलंबित समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चे, आंदोलने केली, तसेच शासनाच्या विविध विभागांकडे पाठपुरावाही केला; मात्र सरकार माथाडी कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. आता जर सरकारने माथाडी कामगारांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी कार्यवाही केली नाही, तर १ फेब्रुवारीला एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येईल, अशी चेतावणी नेते नरेंद्र पाटील यांनी दिली.
माथाडी कामगार सल्लागार समितीची पुनर्रचना करणे, पुनर्ररचित सल्लागार समितीवर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणूक करणे, सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीची पुनर्रचना करणे, विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करून पुनर्ररचित माथाडी मंडळांवर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका करणे, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे, अनुज्ञप्ती धारक तोलणार/माथाडी कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घेणे, माथाडी कामगारांच्या हक्काच्या कामात अडथळा आणून कामगारांवर दहशत निर्माण करणार्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी गृह विभागाने संबंधितांची समिती गठीत करावी, अशा विविध मागण्यांविषयी संघटनेने सतत पाठपुरावा केला आहे.