पुण्‍यश्‍लोक अहिल्‍याबाई होळकर यांच्‍याकडून जनतेविषयी प्रेमभाव आणि स्‍वाभिमान असणारे शासन शिका ! – श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, पुण्‍यश्‍लोक अहिल्‍याबाई होळकर यांचे १३ वे वंशज

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

राजमाता पुण्‍यश्‍लोक अहिल्‍याबाई होळकर यांनी देशभरात अनेक लोकोपयोगी कामे केली. त्‍यांनी आवश्‍यकतेप्रमाणे रणभूमीमध्‍ये शत्रूशी सामनाही केला. आवश्‍यक तेथे बळाचा वापर केला. जेथे जनहिताची कामे करणे आवश्‍यक आहे, तेथे तेच करावे, हे त्‍यांच्‍या चरित्रातून शिकता येते. जनतेविषयी प्रेम, शत्रूशी चिकाटीने सामना करण्‍याची शक्‍ती आणि स्‍वाभिमान असणारे शासन कसे असावे ? याचा आदर्श त्‍यांच्‍याकडून घ्‍यावा.

अहिल्‍याबाई यांची क्षात्रवृत्ती दर्शवणारा प्रसंग !

पेशवा रघुनाथराव यांनी होळकरांचे राज्‍य विलीन करण्‍याचा प्रयत्न केल्‍याचे समजल्‍यावर अहिल्‍याबाई म्‍हणाल्‍या, ‘‘माझे राज्‍य हिरावून घेण्‍याचा कपट रचलात. मला दुबळी समजलात कि खुळी? आता आपली गाठ रणांगणात पडेल! मी हरले तर कीर्ती करून जाईन; पण आपण हरलात, तर आपल्‍याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही; म्‍हणून लढाईच्‍या भरीस न पडाल तर बरे. मला समजू नका. मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले, तर पेशव्‍यांना भारी पडेन. वेळ पडली, तर हत्तीच्‍या पायी साखळीशी बांधून तुमचे स्‍वागत न केले, तर होळकरांच्‍या सुनेचे नाव लावणार नाही.’’ (संदर्भ : संकेतस्‍थळ)