हिंदूंनी आज संघर्ष केला, तरच त्‍यांची पुढची पिढी सुरक्षित राहील ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा

  • कराड येथे ‘हिंदु गर्जना मोर्चा’ : १० सहस्रांहून अधिक हिंदूंचा अभूतपूर्व आविष्‍कार !

  • धर्मांतर, लव्‍ह जिहाद, गोहत्‍या विरोधी कठोर कायद्यांची मागणी !

कराड, २३ जानेवारी (वार्ता.) – भारतभरात हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हत्‍या होत आहेत. हिंदूंंचे धर्मांतर, गोहत्‍या, लव्‍ह जिहाद या विविध माध्‍यमांतून जिहादी वृत्तीच्‍या धर्मांधांकडून हिंदु समाजाला नामशेष करण्‍याचे प्रयत्न केले जात आहेत. हिंदु समाजाने संघटित होऊन संघर्ष केला, तरच येणारी पुढील पिढी सुरक्षित राहू शकेल, असे परखड मत तेलंगाणा येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले. येथील ‘सकल हिंदु समाजा’च्‍या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या ‘हिंदु गर्जना मोर्च्‍या’त ते बोलत होते. महाराष्‍ट्र राज्‍यासह संपूर्ण देशात धर्मांतर, लव्‍ह जिहाद, गोहत्‍या विरोधी कठोर कायदे व्‍हावेत, या मागणीसाठी या मोर्च्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते.  या वेळी आमदार टी. राजासिंह यांनी प्रतापगडाच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या अफझलखानाच्‍या कबरीवरील अतिक्रमण काढल्‍याविषयी शासनाचे अभिनंदनही केले.

वरील मागण्‍यांचे निवेदन कराडचे तहसीलदार विजय पवार यांना व्‍यासपिठावर देण्‍यात आले. मोर्चा दत्त चौक येथे आल्‍यानंतर त्‍याचे सभेत रूपांतर झाले. प्रारंभी सौ. मेघा कदम यांनी त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दीपाली खोत यांनी केले.

आमदार टी. राजासिंह यांनी व्‍यक्‍त केलेले परखड विचार !

आमदार टी. राजासिंह

१. धर्मांधांच्‍या संपर्कात न येता हिंदु मुलींनी सतर्क राहून दैनंदिन व्‍यवहार करावेत.

२. पोलीस प्रशासनाने जिहादी धर्मांधाचा बंदोबस्‍त वेळीच करावा, अन्‍यथा प्रसंगी हिंदुत्‍वनिष्‍ठांना ते काम हाती घ्‍यावे लागेल.

३. सर्वच हिंदूंनी आठवड्यातून एक दिवस किमान एक घंटा तरी हिंदु जागृतीसाठी द्यावा.

४. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रात गोहत्‍याविरोधी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गोहत्‍या होत आहेत. गोहत्‍या रोखायला हवी.

५. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर न मानणार्‍या राज्‍यकर्त्‍यांनी इतिहासाचा अभ्‍यास करावा.

क्षणचित्रे

१. मोर्च्‍याच्‍या मार्गामध्‍ये ठिकठिकाणी भगव्‍या कापडी पताका, झालरी लावण्‍यात आल्‍या होत्‍या, तसेच सर्वत्र भगवे झेंडे, टोपी घालून धर्माभिमानी सहभागी झाले होते.

२. मोर्च्‍याच्‍या प्रारंभी धर्मध्‍वजाचे पूजन करण्‍यात आले.

३. श्री पांढरीचा मारुति मंदिर या ठिकाणाहून मोर्च्‍यास प्रारंभ होऊन चावडी चौक, मेनरोड मार्गे दत्त चौकात मोर्च्‍याचे सभेत रूपांतर झाले.

४. कराड तालुक्‍यातील विविध गावांतून युवक मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते.

५. कराड शहरातील व्‍यापारी वर्ग त्‍यांची दुकाने बंद करून मोर्च्‍यात सहभागी झाला होता.

६. मोर्च्‍याच्‍या शेवटी उपस्‍थित हिंदूंनी हिंदु समाजाच्‍या रक्षणार्थ कार्य करण्‍याची आणि धर्मांधांशी कोणतेही व्‍यवहार न करण्‍याची सामूहिक शपथ घेतली.

उपस्‍थित मान्‍यवर

हिंदु एकता आंदोलनाचे पश्‍चिम महाराष्‍ट्र प्रांतिक उपाध्‍यक्ष श्री. विनायक पावसकर, भाजपचे महाराष्‍ट्र प्रदेश सचिव तथा हिंदु एकता आंदोलनाचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. विक्रम पावसकर, भाजपचे महाराष्‍ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. अतुल भोसले, श्री. मनोज घोरपडे, जयराम स्‍वामी मठाचे मठाधिपती विठ्ठलस्‍वामी महाराज, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे श्री. श्रीकांत एकांडे, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे कराड-पाटण तालुक्‍याचे कार्यवाहक श्री. सागर आमले, गोरक्षण बचाव समितीचे अध्‍यक्ष श्री. सुनील पावसकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल कडणे यांसह विविध राजकीय आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि मान्‍यवर मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.