कोल्हापूर – शाहूपुरी येथील कुंभार गल्लीतील श्री पंचमुखी गणेश सेवा भक्त मंडळाच्या वतीने येथील पंचमुखी गणेश मंदिरात गणेश जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, तसेच सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. वर्ष १९९५ ला स्थापन केलेल्या पंचमुखी गणेश मंदिरास या वर्षी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे सोहळा काळात महाआरती, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, पारायण, भजन, श्रीगणेशाचा अभिषेक, जन्मकाळ आणि पालखी सोहळा, असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २६ जानेवारीला महाप्रसाद वाटप होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेली अनेक वर्षे मंदिराच्या वतीने अंध-अपंग, वृद्ध यांच्या सामाजिक संस्थांना एक वेळ भोजन किंवा भोजनाचे साहित्य प्रदान केले आहे. भोगावती परिते येथील मुलांच्या वसतीगृहास पाणी तापवण्याचा बंब भेट दिला आहे. काटेभोगाव येथील गोशाळेत एक मास चारा वाटप करण्यात आले. मंदिराचे सांस्कृतिक सभागृह असून भागातील मुलांसाठी विनामूल्य बालसंस्कार वर्ग, तलवारबाजी, लाठीकाठी, कराटे, योगाचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रसंगी उपाध्यक्ष उदय कुंभार, उत्सव समिती अध्यक्ष शुभम् कुंभार, उपाध्यक्ष ओंकार पाटील, सचिव अरविंद जाधव, कोषाध्यक्ष शिवाजी बावडेकर, सतिश वडणगेकर, तसेच अन्य उपस्थित होते.