राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या रक्षणासाठी लव्‍ह जिहाद, धर्मांतर अन् गोहत्‍या विरोधी कायदे त्‍वरित लागू करावेत ! – कालिचरण महाराज

पुसद (यवतमाळ) येथे भव्‍य ‘हिंदु गर्जना मोर्चा’ आणि सभा यांचे आयोजन !

पुसद (यवतमाळ), २२ जानेवारी (वार्ता.) – महाराष्‍ट्रात लव्‍ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्‍या विरोधी कायदे, तसेच जनसंख्‍या नियंत्रण कायदा त्‍वरित लागू करावा, अशी मागणी कालिपुत्र कालिचरण महाराज यांनी केली. ते तालुक्‍यातील सकल हिंदु समाज आणि प.पू. बाबूसिंगजी महाराज (गादीपती पोहरादेवी) यांच्‍याकडून आयोजित सकल हिंदु समाजाच्‍या भव्‍य ‘हिंदु गर्जना मोर्चा’नंतर झालेल्‍या सभेत बोलत होते. या मोर्च्‍यासाठी १० सहस्रांहून अधिक हिंदू उपस्‍थित होते. यात आमदार निलय नाईक, जिल्‍हा भाजपाध्‍यक्ष नितीन भुतडा, बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्‍हाध्‍यक्ष  उमाकांत पापीनवार, पुसद अर्बनचे शरद मैंद, रवि ग्‍यानचंदानी, डॉ. उत्तम रुद्रवार, सूरज डुबेवार आदी राजकीय आणि सामाजिक नेते उपस्‍थित होते.

 

या वेळी कालीपुत्र कालिचरण महाराज यांनी हिंदु धर्मावर आघात करणार्‍यांवर कठोर टीका केली. धर्म, हिंदुत्‍व आणि सनातन यांचा अर्थ समजावून सांगितला. ‘जातीयवाद सोडून स्‍वधर्माचे अस्‍तित्‍व टिकवण्‍यासाठी हिंदूंची ‘व्‍होट बँक’ बनवा’, असे आवाहन त्‍यांनी उपस्‍थितांना केले.  यासमवेत पोहरादेवीचे जितेंद्र महाराज आणि निरू महाराज यांनीही मार्गदर्शन केले.

क्षणचित्रे 

१. मोर्च्‍यात महिलांची पुष्‍कळ उपस्‍थिती होती.

२. पोलिसांनी ड्रोनच्‍या साहाय्‍याने मोर्चा आणि सभा यांचे चित्रीकरण केले.