कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या खात्यात कोलकाता येथील दोन आस्थापनांमधील जमा झालेल्या ४९ कोटी ८५ लाख रुपयांचा हिशोब त्यांना द्यावाच लागणार आहे. याच समवेत त्यांच्या जावयाशी संबंधित असलेल्या आस्थापनाला प्रत्येक ग्रामपंचायतींना ५० सहस्र रुपये द्यावे लागतील, असा आदेश काढला होता, त्याचेही अन्वेषण होणार आहे, अशी माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. ते कोल्हापूर येथे १६ जानेवारीला आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, गडहिंग्लज येथील भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे, तसेच अन्य उपस्थित होते.
१. हसन मुश्रीफ हे ग्रामविकासमंत्री असतांना त्यांनी त्यांच्या जावयाशी संबंधित आस्थापनास महाराष्ट्रातील २७ सहस्र ८०० ग्रामपंचायतींनी प्रत्येकी ५० सहस्र रुपये देण्याचा आदेश काढला होता. हा एक प्रकारचा ‘जिझिया कर’च होता. १५० कोटी रुपये प्रत्येक वर्षी असे १० वर्षांत दीड सहस्र कोटी रुपये देण्यात येणार होते. या प्रकरणी मी आवाज उठवल्यावर हा आदेश रहित झाला; मात्र काढण्यात आलेल्या आदेशाचे अन्वेषण तर होणारच आहे.
२. मुंबई येथील ‘जम्बो कोविड सेंटर’च्या संदर्भात आज मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचे अन्वेषण सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांच्याकडून होत असून यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आहे.
३. शिवसेनेच्या (शिंदे गट) खासदार भावना गवळी, तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर असलेल्या आरोपांच्या संदर्भात, तसेच यापूर्वी मी ज्यांच्या ज्यांच्या संदर्भात तक्रारी प्रविष्ट केल्या, त्यातील एकही तक्रार मागे घेतलेली नाही. भावना गवळी आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर जे घोटाळ्यांचे आरोप आहेत, ते उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच त्या संदर्भातील अधिक माहिती द्यावी.
४. वर्ष २०१९ मध्ये मला कोल्हापूर येथे येण्यापासून अवैधरित्या रोखण्यात आले होते. या प्रकरणी मी केंद्रीय मानवाधिकार आयोग आणि ‘पोलीस ऑथॉरिटी’ यांच्याकडे तक्रार केली होती. या संदर्भात सुनावणी होऊन संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी माझी क्षमा मागितली आहे. या प्रकरणी ‘त्यांना आदेश देणारे राजकीय नेते यांच्यावर कारवाई करावी’, अशी मागणी मी केली आहे.
सकाळी कोल्हापूर येथे आल्यावर किरीट सोमय्या यांनी श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. ‘भ्रष्टाचाराच्या विरोधात चालू असलेल्या लढ्यात देवीकडून शक्ती आणि तिचे आशीर्वाद मिळावे; म्हणून मी आलो आहे’, असे त्यांनी या वेळी सांगितले. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी त्यांना देवस्थानच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली दिनदर्शिका भेट दिली. |