हडपसर येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीला धर्मप्रेमींचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

हडपसर येथील वाहनफेरीत दुमदुमला हिंदुत्‍वाचा जयघोष !

हडपसर येथील वाहनफेरीत उपस्‍थित धर्मप्रेमी

हडपसर (पुणे) ७ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने हडपसर येथे ८ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाचे मैदान, काळेपडळ येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा’ आयोजित करण्‍यात आली आहे. या सभेच्‍या प्रसारासाठी ७ जानेवारी या दिवशी वाहनफेरी काढण्‍यात आली. या वाहनफेरीला हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि धर्मप्रेमी यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला. फेरीत असणारे भगवे ध्‍वज, धर्माभिमानी हिंदूंनी परिधान केलेले भगवे फेटे, फेरीत देण्‍यात आलेल्‍या हिंदुत्‍व जागृत करणार्‍या घोषणा यांमुळे अवघे हडपसर भगवेमय झाले होते.

प्रारंभी हिंदु धर्माचे प्रतीक असणार्‍या धर्मध्‍वजाचे पूजन करण्‍यात आले. ‘ओम जयशंकर प्रतिष्‍ठान’चे संस्‍थापक अध्‍यक्ष आणि ब्रह्म महाशिखर परिषदेचे (भारत) अध्‍यक्ष श्री. पप्‍पाजी पुराणिक यांनी धर्मध्‍वजाला पुष्‍पहार अर्पण केला, तसेच त्‍यांच्‍या शुभहस्‍ते श्रीफळ वाढवण्‍यात आले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मूर्तीला हार अर्पण करण्‍यात आला. यानंतर तुकाई दर्शन चौक मार्गाने निघालेल्‍या फेरीचा समारोप कै. मारुतराव काळे शाळेच्‍या मैदानात झाला. फेरीच्‍या मार्गावर विविध चौकांमध्‍ये ११ हून अधिक ठिकाणी पुष्‍पवृष्‍टी आणि फेरीचे स्‍वागत करण्‍यात आले.

फेरीच्‍या समारोपप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी उपस्‍थितांना संबोधित करून ८ जानेवारी या दिवशी होत असलेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेसाठी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित रहाण्‍याचे आवाहन केले. तसेच हिंदु जनजागृती समितीच्‍या रणरागिणी शाखेच्‍या कु. क्रांती पेटकर यांनीही मनोगत व्‍यक्‍त करून सर्वांना सभेसाठी उपस्‍थित रहाण्‍याचे आवाहन केले.

क्षणचित्रे

१. फेरीमध्‍ये २०० हून अधिक दुचाकी आणि १० हून अधिक चारचाकी घेऊन धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

२. वाहनफेरीत अनेक धर्मप्रेमींनी उस्‍फूर्तपणे धर्मध्‍वजाचे स्‍वागत केले.

३. या फेरीत ५०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्‍थित होते.