(म्हणे) ‘अयोध्येत बांधण्यात येणारे श्रीराममंदिर पाडून बाबरी मशीद उभारू !’

अस्तित्वासाठी धडपडत असलेल्या ‘अल् कायदा’ची धमकी !

नवी देहली – ‘अल् कायदा’ या कुख्यात जिहादी आतंकवादी संघटनेने अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेले भव्य श्रीराममंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. अल् कायदाने त्याच्या ‘गझवा-ए-हिंद’ (भारताचा विनाश) नियतकालिकाच्या डिसेंबरच्या आवृत्तीत ‘श्रीराममंदिर पाडून तेथे भव्य बाबरी मशीद बांधू’, असे म्हटले आहे. भारतीय मुसलमानांना ‘जिहाद’चे समर्थन करण्याचेही आवाहन यात करण्यात आले आहे. या  नियतकालिकात वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीचाही उल्लेख आहे.

१. नियतकालिकात म्हटले आहे की, बाबरी मशिदीच्या पायावर बांधण्यात येणारे श्रीराममंदिर पाडून मूर्तींच्या जागी अल्लाच्या नावाने बाबरी मशीद पुन्हा बांधली जाईल. मुसलमानांनी आतापर्यंत पुष्कळ सहन केले आहे. त्यामुळे आता त्यांनी कोणत्याही प्रकारच्या हानीला घाबरू नये. प्राण आणि वित्त यांचा वापर जिहादसाठी केला असता, तर इतकी हानी झाली नसती.

२. संपूर्ण भारतीय उपखंड इस्लामचा भाग व्हावा आणि मूर्तीपूजा बंद व्हावी, यासाठी अल् कायदाचा जिहाद लढण्याचा मानस आहे, असेही यात म्हटले आहे.

३. या नियतकालिकात पुढे म्हटले आहे की, धर्मनिरपेक्षता भारतीय मुसलमानांसाठी नरक आहे, तर ‘हिंदु आणि मुसलमान बंधूभाव’ची घोषणा ही एक प्रकारची फसवणूक आहे. (सर्वधर्मसमभाववाल्यांना चपराक ! – संपादक)

(म्हणे) ‘हिंदूंना लाठ्या वापरायला शिकवण्यासह शस्त्रांना धार लावली जात आहे !’

गुजरात दंगलीचा उल्लेख करतांना या नियकालिकात म्हटले आहे की, ३० वर्षांपूर्वी बाबरी मशीद पाडण्यात आली. २० वर्षांपूर्वी (गुजरात दंगलीच्या वेळी) गरोदर महिलांचे पोट फाडण्यात आले. त्यांच्या मुलांना ठार मारण्यात आले. आज सर्वत्र बुलडोझर चालवण्यात येत आहे. सर्व हिंदूंना लाठी वापरण्यास शिकवले जात आहे. भाजी कापण्यासाठी वापरल्या जाणार्‍या चाकूने मुसलमानांचे चेहरे आणि डोके कापण्याच्या गोष्टी हिंदु महिलांच्या तोंडातून बाहेर पडत आहेत. जामिया मिलिया इस्लामिया, अलीगड; जामिया उस्मानिया, भाग्यनगर आणि देवबंद येथील प्रत्येक मुसलमानांविरुद्ध हिंदू चाकू, भाले आणि तलवारी धारदार करत आहेत. (जिहाद्यांना एके-४७ रायफल चालवण्याचे, बाँब फेकण्याचे, शस्त्र चालवण्याचे, तसेच हिंदूंचे शीर कापण्याचे प्रशिक्षण दिले जाते, ते काय सत्याग्रह करण्यासाठी, असे अल् कायदाला म्हणायचे आहे का ? हिंदूंवर अशा प्रकारे आरोप करून भारतातील मुसलमानांना शस्त्रे बाळगण्यास चिथावणी देणारे अल् कायदाचे हे नियतकालिक देशात प्रसारित होणार नाही, याकडे सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘अल् कायदा’ला आता शेवटची घर घर लागली आहे. अशा वेळी संघटनेला पुन्हा उभारी देण्यासाठी अशा प्रकारची विधाने करून मुसलमानांना आपल्याकडे वळवण्याचा आणि ‘आम्ही अजूनही मुसलमानांचे तारणहार आहोत’, असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न ‘अल् कायदा’ करत आहे, हेच यातून स्पष्ट होते !
  • अयोध्येत श्रीराममंदिर उभारण्यासह त्याचे २४ घंटे संरक्षण करणे आवश्यक आहे, हेच अशा धमक्यांतून लक्षात येते !
  • ‘जिहादी आतंकवाद्यांना धर्म नसतो’ म्हणणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आता कुठल्या बिळात लपले आहेत ?