अल्पसंख्यांक शाळांमधील पदभरती शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी केली जाईल ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

विधान परिषद प्रश्नोत्तरे…

श्री. दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील अल्पसंख्यांक समाजाचे शैक्षणिक धोरण सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या अभ्यासगटाचा अहवाल प्राप्त झाला आहे. याविषयी आर्थिक गोष्टी पडताळून शिफारसी स्वीकारण्याची कार्यवाही केली जाईल. त्याचसमवेत अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक संस्था आणि शाळा यांमधील पदभरती हे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक धोरणाविषयी अभ्यासगटाने सादर केलेल्या अहवालाविषयी सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी ३० डिसेंबर या दिवशी प्रश्नोत्तराच्या घंट्यात प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी केसरकर बोलत होते.


शिक्षकांचा पगार थेट खात्यात जमा होण्यासाठी प्रयत्न करू ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वेतन अधिकारी कार्यालयांत शिक्षकांना जावे लागू नये, यासाठी ‘ऑनलाईन’ पद्धती चालू करणार आहोत. शिवाय शिक्षकांचा पगार थेट बँकेत जमा होण्यासाठीही राज्यशासनाद्वारे  प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली. शिक्षण कार्यालयात कर्मचारी अल्प असल्याने कामात दिरंगाई होत असल्याविषयी सदस्य डॉ. रणजित पाटील यांनी ३० डिसेंबर या दिवशी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

त्याला उत्तर देतांना मंत्री केसरकर म्हणाले की, राज्यात पदभरतीची मोहीम चालू असून काही पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. कर्मचारी वाढल्यानंतर कामात दिरंगाई होणार नाही. जनता किंवा शिक्षक यांना कोणत्याही कार्यालयात जावे लागू नये यासाठी ‘कॅशलेस’ आणि ‘डिजिटलायझेशन’ पद्धती चालू करण्यात येणार आहे. खासगी आणि अंशत: अनुदानित शाळांना न्याय देणार आहे.


अकोला जिल्ह्यातील बालकांच्या पोषण आहाराविषयी पर्यायी व्यवस्था करू ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील बालकांच्या पोषण आहाराविषयी निविदा प्रक्रियेसंदर्भात न्यायालयात स्थगिती असल्याने २ वर्षांपासून पोषण आहार देण्यात आला नाही; मात्र राज्यशासनाने सध्या पर्यायी व्यवस्था करत पोषण आहार चालू केला आहे. गेल्या २ वर्षांचा पोषण आहार घरपोच केला जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ३० डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत दिली.

शालेय पोषण आहाराविषयी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना केसरकर म्हणाले की, शालेय पोषण आहारांतर्गत स्वयंपाकी आणि साहाय्यनीस यांचे ऑक्टोबर २०२२ पर्यंतचे मानधन देण्यात आले आहे. शिवाय खाद्य तेलाचे अनुदानही वितरित केले आहे. इंधन आणि भाजीपाला यांचे अनुदान अन् तांत्रिक अडचणी यांमुळे एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या कालावधीचे ७० टक्के अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित अनुदानही देण्यात येणार आहे.

केसरकर म्हणाले की, नागपूर येथील सुसंस्कार बचत गटावर तांदळाचा अपव्यवहार केल्याने त्यांचे काम रहित करून काळ्या सूचीत टाकून पोलीस कारवाई करण्यात येत आहे. पोषण आहार योजनेच्या निविदेमध्ये सध्या १९ महिला बचत गट सामील असून ‘ई-निविदा’ प्रक्रिया पूर्ण पारदर्शक राबवली जाते. यामुळे यामध्ये कोणताही अपव्यवहार होत नाही.


शिक्षकांचे वेतन वेळेवर होण्यासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – शिक्षकांचे वेतन वेळेवर होण्यासाठी ‘ऑनलाईन’ पद्धतीने वेतन थेट अधिकोषात जमा करण्याची पद्धती राज्यशासन चालू करणार असून वेतन वेळेवर होण्यासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ३० डिसेंबर या दिवशी विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाच्या घंट्यात सांगितले. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रवीण दराडे, निरंजन डावखरे आणि डॉ. सुधीर तांबे यांनी सहभाग घेतला.

राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे थकित वेतन, प्रलंबित वैद्यकीय देयके आणि सातव्या वेतनाचे हप्ते याविषयीचा प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. श्री. केसरकर म्हणाले की, शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला आणि दुसरा हप्ता देण्यात आला आहे. तिसरा हप्ता देण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. शिवाय सर्व जिल्हा परिषदांना वेतनांचा निधी वेतनावर व्यय करण्याच्या सूचना देण्यात येतील, तसेच वैद्यकीय देयकासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.