राज्यपालाच्या कृतीवर आक्षेप घेणारे अशोक चव्हाण यांना सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी फटकारले !

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – रामटेक (नागपूर) येथील संस्कृत विद्यापिठात उभारण्यात आलेल्या वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपस्थित रहाण्यास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नकार दिला होता. याविषयी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सभागृहात अप्रसन्नता व्यक्त केली.

राज्यपालांच्या हेतूविषयी सभागृहात प्रश्न उपस्थित करता येत नाही. ‘मुख्यमंत्रीपद भूषवले असतांनाही याविषयी माहिती कशी नाही ?’, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात अशोक चव्हाण यांना फटकारले, तसेच अशोक चव्हाण यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. यावर ‘सभापती राहुल नार्वेकर यांनी वक्तव्य पडताळून काढण्यात येईल’, असे सांगितले.

 (सौजन्य : TV9 Marathi) 

देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव हे रामटेक मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले असल्याची माहिती सभागृहात देत अशोक चव्हाण यांनी राव यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला राज्यपालांनी नकार देण्याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. या वेळी अध्यक्ष नार्वेकर यांनी चव्हाण यांना थांबवून ‘विधीमंडळाच्या नियमानुसार राज्यपालांच्या कृतीविषयी सभागृहात आक्षेप घेता येत नाही’, हे अशोक चव्हाण यांच्या लक्षात आणून दिले.