अत्यंत कष्टमय जीवन जगत असतांना देवाचा आधार घेऊन कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाणार्‍या आणि मुलींवर चांगले संस्कार करणार्‍या डिचोली, गोवा येथील श्रीमती सुमती सुरेश पेडणेकर (वय ७४ वर्षे) !

‘१२.१२.२०२२ या दिवशी माझी आई श्रीमती सुमती सुरेश पेडणेकर ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने तिची माझ्या, तसेच माझी लहान बहीण सौ. सुप्रिया केरकर आणि माझे यजमान श्री. सुनील नाईक यांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्रीमती सुमती पेडणेकर

श्रीमती सुमती सुरेश पेडणेकर यांना ७४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

१. सौ. सुषमा सुनील नाईक (मोठी मुलगी, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. आईला लग्नासाठी स्थळ आल्यावर ‘मुलगा दारू पितो’, असे परिचितांकडून समजणे; पण ‘आजीने लग्नासाठी शब्द दिला आहे’, हे कळल्याने आईने स्थळाला होकार देणे : माझ्या आईचे माहेर हडफडे (कळंगुट, गोवा) येथे आहे. बालपणापासून ती माझी आजी (कै. (श्रीमती) जानकी पिर्ळणकर) यांच्या समवेत तेथे रहात होती. माझ्या आईला लग्नासाठी एक स्थळ आले. तेव्हा एका ओळखीच्या व्यक्तीने आईला सांगितले की, ‘मुलगा (माझे वडील) दारू पितो.’ त्या वेळी माझी आजी म्हणाली, ‘‘मी या लग्नासाठी दुसर्‍यांना शब्द दिला आहे. तो मी आता परत घेणार नाही.’’ माझ्या आजीचे हे शब्द ऐकल्यावर आईने विरोध न करता आनंदाने आलेल्या स्थळाशी (माझ्या वडिलांशी) लग्न केले.

१ आ. जीवनात आलेल्या अनेक अडचणींवर मात करून स्थिर रहाणारी आई !

१ आ १. लग्नानंतर वडिलांचा, तसेच अन्य कुणाचा आधार नसतांना आईने हार न मानणे : आईचे माहेर आणि सासर असे दोन्हीकडील जीवन पुष्कळ कष्टात गेले. लग्नानंतर माझ्या वडिलांची दारू प्यायची सवय न्यून न होता वाढतच गेली. त्यामुळे तिला वडिलांकडून संसारासाठी काही आर्थिक साहाय्य झाले नाही. तिला अन्य कुणाचाच आधार नव्हता. तिला अनेक शारीरिक, मानसिक, व्यावहारिक आणि आध्यात्मिक अडचणी आल्या, तरीसुद्धा हार न मानता अडचणींना तोंड देत ती स्थिर राहिली.

१ आ २. जुळ्या मुली जन्माला आल्यावर त्यांच्या दुधासाठी आईला दागिने विकावे लागणे : वडील नोकरी करून थोडे पैसे मिळवायचे; पण ते दारू पिण्यात घालवायचे. वर्ष १९८२ मध्ये माझ्या पाठच्या बहिणींचा जन्म झाला. त्या जुळ्या मुली असल्यामुळे त्यांना दूध देण्यासाठीसुद्धा आईकडे पैसे नव्हते. आईला दागिने विकून माझ्या बहिणींसाठी दुधाची पावडर विकत आणावी लागली.

१ इ. सर्वांशी सहजतेने जवळीक साधून त्यांना आपलेसे करणारी आई ! : माझ्या आईचा स्वभाव प्रेमळ आहे. तिला कितीही त्रास होत असला, तरी ती स्वतः त्रास सहन करून इतरांना साहाय्य करते. आईचे पाय सतत दुखतात आणि तिच्या पायाची बोटे वाकडी झाली आहेत. अशा स्थितीतही ती इतरांच्या घरी जाऊन तेथील नवजात (नुकत्याच जन्मलेल्या) बालकांना अंघोळ घालण्याचे काम करते. हे काम केल्यावर ती घरी येऊन घरचीही कामे करते. आई जिथे कामाला जाते, तेथील लोकांशी जवळीक साधून त्यांना आपलेसे करते. आईतील प्रेमभावामुळे लोक आपणहून आईला दुचाकी आणि चारचाकी गाडीने कामाच्या ठिकाणी घेऊन जातात अन् परत घरी सोडतात.

१ ई. रुग्णांना घरगुती औषधे सांगणे : आईचा घरगुती औषधांचा अभ्यास आहे. कधी कुणी लहान बाळ आजारी पडल्यास त्याचे पालक आईला घरगुती औषधे विचारतात. तिने सांगितलेली औषधे घेऊन बरीच बाळे बरी होतात.

१ उ. स्वतःच्या मृत्यूविषयी आईचे विचार ! : मला एकदा आईच्या मृत्यूविषयी स्वप्न पडले. मी याविषयी आईला सांगितल्यावर ती सहजतेने म्हणाली, ‘‘माझी मृत्यूची वेळ जवळ आल्यावर तुम्ही तरी काय करणार ? ती वेळ कुणाच्याही हातात नसते.’’ हे तिने सहजरित्या मला सांगितले. त्या वेळी तिने ‘मृत्यूलाही सहजतेने स्वीकारले आहे’, असे माझ्या लक्षात आले.

१ ऊ. आईचा देवाप्रती भाव असल्याने तिला देवाचा आधार वाटणे : आईला माहेर किंवा सासर येथील कुणाचाच आधार नव्हता. त्यामुळे तिला केवळ ईश्वराचाच आधार वाटू लागला. दैनंदिन जीवन जगत असतांना ती देवाचे स्मरण करून त्याच्या अनुसंधानात रहाते. ती आपल्या अडचणी देवाला सांगून त्याचे साहाय्य घेते. त्यामुळे तिच्या अडचणी सुटतातही. ‘देव इतरांच्या माध्यमातून साहाय्यासाठी धावून येतो’, असा तिचा भाव असतो.

१ ए. आईचा साधनेसाठी असलेला विरोध न्यून होणे : प्रारंभी आईचा माझ्या साधनेला विरोध होता. खरेतर मी सनातनच्या माध्यमातून साधना करू लागल्यावर आमच्या घरची स्थिती सुधारली आहे. आता आईचा विरोध न्यून झाला आहे. आता ती सनातन-निर्मित उदबत्ती वापरते आणि घरात नामजप लावला, तरी विरोध करत नाही.

१ ऐ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वेळोवेळी आईच्या प्रकृतीची विचारपूस करणे आणि ‘त्यांनी दिलेल्या प्रसादातून आईला जगण्यासाठी शक्ती मिळत आहे’, असे जाणवणे : पूर्वी कधी सेवेनिमित्त माझी परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली की, ते आईच्या प्रकृतीची विचारपूस करायचे. मी त्यांना आईचे कष्ट आणि त्रास यासंदर्भात सांगायचे. त्या वेळी ते म्हणायचे, ‘‘तू आईला आश्रमात घेऊन ये. आश्रमात आधुनिक वैद्य आहेत. आपण तिच्यावर उपचार करूया. तू घरी जातांना आईला आवडेल तो गोड किंवा तिखट खाऊ घेऊन जा बरं.’’

‘हा खाऊ (प्रसाद) म्हणजे गुरुमाऊलींनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आईसाठी दिलेली दिव्य शक्ती असून यातून तिला जीवन जगण्यासाठी शक्ती मिळत आहे’, असे मला जाणवते. गुरुमाऊलींच्या मुखात एखाद्या व्यक्तीचे नाव येणे, ही तिच्यावर असलेली गुरुकृपाच आहे.

हे गुरुमाऊली, आईच्या रूपाने तुम्ही आमच्यावर लहानपणापासून चांगले संस्कार केले. तुमच्या कृपेमुळे एवढी प्रेमळ आणि अनेक गुण असलेली आई आम्हाला मिळाली. त्यामुळे आम्ही तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

२. सौ. सुप्रिया शेखर केरकर (मधली मुलगी), पणजी, गोवा.

सौ. सुप्रिया केरकर

२ अ. वडिलांच्या निधनानंतर आईने दिवसरात्र कष्ट करून संसार करणे आणि तिने केलेल्या संस्कारामुळे सर्व बहिणी स्वाभिमानाने जगू शकणे : ‘आम्ही लहान असतांनाच माझ्या बाबांचे निधन झाले. त्यामुळे आम्हा तिन्ही बहिणींचे दायित्व आईवरच होते. ती शेतात आणि लोकांच्या घरी कामे करून पुष्कळ कष्ट करून पैसे मिळवायची. कुणी कुठलेही काम सांगू दे, सर्व कामे करण्याची तिची सिद्धता असायची. तिने कधी स्वतःच्या जिवाची काळजी केली नाही. दिवसरात्र कष्ट केले. ती मिळवत असलेल्या पैशातून ती आमचे शिक्षण आणि घरातील व्यय करत असे. तिच्यामुळे आम्हा तिघींचे शिक्षण पूर्ण झाले. आज त्या माऊलीने केलेल्या संस्कारांमुळे आम्ही तिघी जणी आता सुखाने आणि स्वाभिमानाने जगत आहोत.’

श्री. सुनील नाईक आणि सौ. सुषमा नाईक

३. श्री. सुनील नाईक (मोठे जावई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३ अ. प्रेमभाव : ‘माझ्या सासूबाई सतत इतरांचा विचार करतात. या वयातही त्या घरची कामे पुढाकार आणि दायित्व घेऊन करतात. मी सासरी डिचोली येथे गेल्यावर त्या माझ्यासाठी आवडता पदार्थ करून ठेवतात.

३ आ. इतरांना समजून घेणे : एकदा एका प्रसंगात माझ्याकडून चूक झाली होती. त्या प्रसंगात सासूबाईंनी मला मुलाप्रमाणे सांभाळून घेतले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २७.११.२०२२)