संत हे ईश्वराचे सगुण रूप आहेत. अशा या सगुण रूपातील संतांमध्ये अनेक गुण असतात. अशाच एक संत म्हणजे सनातनच्या ११७ व्या संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी (वय ८३ वर्षे) ! सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या त्या मातोश्री असून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सासूबाई आहेत. देवाने मला त्यांचा अनमोल सत्संग दिला. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. व्यवस्थितपणा
अ. पू. आजी त्यांच्या सर्व वस्तू जागच्या जागी ठेवतात.
आ. पू. आजी स्वतःची औषधे न चुकता आणि वेळच्या वेळी घेतात.
२. प्रेमभाव
२ अ. साधकांचे कौतुक करणे : पू. आजी घरी येणार्या प्रत्येक साधकाचे भरभरून कौतुक करतात. ‘सर्व साधक चांगले आहेत आणि ते नेहमी हसतमुख असतात’, असे त्या म्हणतात.
२ आ. घरी येणारे साधक आणि नातेवाईक बाहेर निघाले की, त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी देवाला प्रार्थना करणे : साधक किंवा नातेवाईक घरातून बाहेर जात असतांना पू. आजी त्यांना खिडकीतून ‘टाटा’ करतात आणि नमस्कार करून काहीतरी बोलतात. मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही नमस्कार करतांना काय म्हणता ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी देवाला सांगते, त्यांचा प्रवास सुखाचा कर. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा अडथळे येऊ देऊ नको. तू त्यांना सुखरूप घरी पोचव.’’
३. इतरांचा विचार करणे
अ. त्यांच्या सेवेत असणार्या साधकांना साहाय्य व्हावे; म्हणून त्या स्वतःचा हातरुमाल स्वतः धुतात, तसेच त्यांचे धुवायचे कपडे साबणाच्या चुर्यात भिजत घालून ठेवतात.
आ. पलंगाच्या लाकडी पट्टीवर कंगवा ठेवल्यावर त्यावर तेलाचे डाग पडतात; म्हणून त्या लाकडी पट्टीवर कंगव्याखाली रुमाल ठेवतात. त्या वेळी ‘तेलाचे डाग पुसण्यात साधकांचा वेळ वाया जाऊ नये’, असा त्यांचा विचार असतो.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
पू. आजींची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर निस्सीम भक्ती आहे. पू. आजी त्यांना ‘बाबा’ असे म्हणतात. त्यांच्या घरातील देवघरात असलेल्या गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहून त्या बोलत असतात. त्या म्हणतात, ‘माझ्या बाबांना बरे ठेव.’’ ‘गुरुदेवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये’, असे त्यांना वाटते. त्या स्वतःसाठी काही मागत नाहीत; परंतु ‘बाबा चांगले राहू देत’, अशी देवाजवळ प्रार्थना करतात.
५. पू. आजींमध्ये जाणवत असलेले पालट
पू. आजींचा चेहरा गुलाबी दिसू लागला आहे आणि त्यांची त्वचा कापसासारखी मऊ झाली आहे.
‘हे गुरुदेवा, तुम्ही मला पू. आजींचा जवळून सत्संग दिला. त्यामुळे मला त्यांचे चैतन्य अनुभवायला मिळाले. यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. सुजाता सावंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१०.२०२२)