कर्नाटकातील पर्यटनासंबंधीचे फलक फाडले !

सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मराठीजनांकडून रोष व्यक्त !

कर्नाटकातील पर्यटनासंबंधीचे फलक फाडले

नागपूर – सीमाप्रश्नी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांतील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. ४ डिसेंबर या दिवशी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथील विमानतळावर आले, त्या वेळी विमानतळातून बाहेर निघण्याच्या मार्गावर असलेल्या मोक्याच्या ठिकाणी कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाचे फलक लावण्यात आले होते. हे फलक आता फाडण्यात आले आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर हे फलक लावल्याने मराठीजनांचा रोष उफाळून आला आहे. ‘सी कर्नाटका ए न्यू’ असे कर्नाटक पर्यटन विभागाचे फलक विमानतळावर लावण्यात आले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि पर्यटनमंत्री आनंद सिंग यांची छायाचित्रे असलेल्या फलकांवर ‘अवर स्टेट मेनी प्राईड’ असे घोषवाक्य लिहिलेले आहे. विमानतळाबाहेर अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेले कर्नाटक सरकारचे हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.