बरेली (उत्तरप्रदेश) येथे येशू ख्रिस्त्याच्या प्रार्थनेच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न

६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !

बरेली (उत्तरप्रदेश) – येथे हिंदूंचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. हिंदूंच्या संघटनांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार केली होती. या भागात गेल्या २० वर्षांपासून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत आहे.

१. येथील मोहल्ला बंशीनगला येथे एका घरात १९ नोव्हेंबरला लोकांना जमा करण्यात आले होते. यात महिलांची संख्या अधिक होती. हिंदूंच्या संघटनांनी याची माहिती मिळाल्यावर ते तेथे पोचल्यावर त्यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या घरामध्ये हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्यात येत होता, तसेच येथे येशू ख्रिस्ताची प्रार्थना करण्यात येत होती.

२. भगवान दास नावाच्या व्यक्तीने येथे प्रार्थनेचे आयोजन केले होते. पोलिसांनी त्याला कह्यात घेतले आहे. त्याने येथे नियमित प्रार्थना आयोजित केली जात असल्याची स्वीकृती दिली; मात्र धर्मांतर करण्यात येत असल्याचा आरोप त्याने फेटाळला. भगवान दास याला पोलिसांच्या कह्यातून सोडवण्यासाठी मोठ्या संख्येने त्याचे समर्थक पोलीस ठाण्याबाहेर गोळा झाले होते.

संपादकीय भूमिका

देशात कठोर धर्मांतरविरोधी कायदा कधी होणार ?, असा प्रश्‍न अशा घटनांमुळे सतत उपस्थित होत आहे, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे !