आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अल्प असल्यास एखाद्या रागातून संगीतशास्त्रात सांगितल्याप्रमाणे नादमय तत्त्वलहरी प्रक्षेपित होणे आणि आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक असेल, तर संगीतशास्त्राला अध्यात्मशास्त्राची जोड मिळाल्यामुळे संगीतातून आवश्यकतेनुसार तारक किंवा मारक शक्ती प्रक्षेपित होणे !
एका कलाकाराने ३०.१२.२०२१ या दिवशी सतारीवर ‘राग भैरवी’ वाजवला. या वादनाचा आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांवर काय परिणाम होतो हे अभ्यासण्यास आले. या रागाचे परीक्षण आणि साधकाच्या पातळीनुसार त्याचे विश्लेषण या लेखात देत आहोत.
१. ‘भैरवी’ या रागाचे आध्यात्मिक वैशिष्ट्य
‘भैरवी’ या रागामध्ये दशमहासिद्धींपैकी ‘भैरवी’ या सिद्धिरूपिणीदेवीची शक्ती ५ टक्के कार्यरत आहे. शिवाचा अंशावतार ‘भैरव’ याची ती शक्ती आहे. कार्यक्रमाची सांगता करत असतांना हा राग गायल्यामुळे त्यातील कोमल स्वरांतून प्रक्षेपित झालेली तारक शक्ती आणि चैतन्य यांच्यामुळे कलाकार अन् श्रोते यांच्या सर्व नाड्या अकार्यरत होऊन त्यांना शांतीची अनुभूती येते. त्यामुळे त्यांना यापुढे दुसरे स्वर ऐकण्याची इच्छाच उरत नाही. जेव्हा एखादी दैवी शक्ती अप्रकट अवस्थेत असते, तेव्हा तिचे निर्गुण तत्त्व कार्यरत होऊन शांतीची अनुभूती येते. जेव्हा दैवी शक्ती प्रकट असते, तेव्हा तिच्यामध्ये सगुण-निर्गुण स्तरावरील तत्त्व कार्यरत होऊन शक्तीची अनुभूती येते. अन्य वेळी जेव्हा ‘राग भैरवी’मध्ये असणारी शक्ती अप्रकट अवस्थेत असते, तेव्हा इतरांना शांतीची अनुभूती येते. एका कलाकाराने जेव्हा सतारीवर ‘राग भैरवी’ वाजवली, तेव्हा त्या रागातील ‘भैरवीदेवीची शक्ती’ प्रकट झाली आणि तिच्या शक्तीलहरींचे सतारीच्या नादलहरींतून प्रक्षेपण झाल्यामुळे प्रयोगाला उपस्थित असणार्या अनिष्ट शक्तींचा त्रास असणार्या साधकांना पुष्कळ प्रमाणात चैतन्य मिळाले.
२. कलाकाराची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अल्प असल्यास संगीतातून केवळ संबंधित रागाच्या नादलहरी प्रक्षेपित होणे आणि त्याची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक असल्यास संगीतशास्त्राला अध्यात्मशास्त्राची जोड मिळाल्यामुळे नादलहरींसह रागाशी संबंधित असणारी दैवी शक्ती प्रक्षेपित होणे
कलाकाराची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अल्प असल्यास एखाद्या रागातून संगीतशास्त्रात सांगितल्याप्रमाणे नादमय लहरी प्रक्षेपित होतात. आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक असेल, तर संगीतशास्त्राला अध्यात्मशास्त्राची जोड मिळाल्यामुळे संगीतातील विशिष्ट रागाशी संबंधित असणारी विशिष्ट प्रकारचे दैवी तत्त्व जागृत होते. त्यामुळे संगीतातून केवळ रागाशी संबंधित असणार्या नादलहरी प्रक्षेपित न होता त्या रागाशी संबंधित असणारे दैवी तत्त्व आवश्यकतेनुसार तारक किंवा मारक शक्तीच्या स्वरूपात प्रक्षेपित होते.
३. एका कलाकाराने ३०.१२.२०२१ या दिवशी सतारीवर ‘राग भैरवी’ वाजवल्यामुळे सतारीच्या नादलहरींतून श्री भैरवीदेवीची प्रकट स्तरावरील मारक शक्ती प्रक्षेपित होऊन साधकांसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय होणे
एका कलाकाराने ३०.१२.२०२१ या दिवशी सतारीवर ‘राग भैरवी’ वाजवला होता. तेव्हा हा संगीताचा प्रयोग अनिष्ट शक्तींचा त्रास असणारे आणि नसणारे अशा दोन्ही प्रकारच्या साधकांसाठी घेण्यात आला. तेव्हा या रागामध्ये कार्यरत झालेली ‘श्री भैरवीदेवी’ची प्रकट मारक शक्ती प्रयोगाला उपस्थित असणारे आणि अनिष्ट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांच्या दिशेने प्रक्षेपित झाली. त्यामुळे त्यांना चैतन्य मिळून त्यांना होणारा अनिष्ट शक्तींचा त्रास न्यून झाला.
४. संगीतातील कलाकाराची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अल्प असणे आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक असणे यानुसार सूक्ष्म स्तरावर होणारा परिणाम
टीप – कलाकाराच्या भावामुळे कलाकाराकडे ईश्वरी चैतन्याचा ओघ येऊन त्याच्या कलेतील सुप्तावस्थेत असलेले देवतेचे तत्त्व जागृत होऊन त्याच्या कलेतून देवतेची शक्ती आणि चैतन्य जागृत होते.
निष्कर्ष
‘राग भैरवी’ हा जर अनिष्ट शक्तींचा त्रास असणार्या साधकांच्या समोर वाजवला आणि हा राग वाद्यावर वाजवणार्या कलाकाराची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक असेल, तर त्याच्याकडून आवश्यतेनुसार तारक किंवा मारक शक्तीचे प्रक्षेपण होते. अन्य ठिकाणी हा राग वाद्यावर वाजवत असतांना जर कलाकाराची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अल्प असेल, तर रागातून शास्त्रानुसार सांगितलेली स्पंदने प्रक्षेपित होतात. हेच सूत्र गायक, वादक आणि नर्तक यांच्या शास्त्रीय कलेलाही लागू होते.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०२२)