पुणे येथे अतिरिक्‍त पाणी वापरणार्‍यांना महापालिकेची कारवाईची चेतावणी !

पुणे – पुणे महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घरोघरी मीटर बसवल्‍यानंतर पाण्‍याचा वापर किती होतो, हे प्रतिमासाला स्‍पष्‍ट होत आहे. प्रतिव्‍यक्‍ती १५० लिटरपेक्षा अधिक पाणी वापरले जात असल्‍याने आतापर्यंत अशा ४ सहस्र ६०० ग्राहकांना पाणी वापर अल्‍प न केल्‍यास कारवाईची चेतावणी देण्‍यात आली आहे. शहरात असमान पाणीपुरवठा होत असून काही भागांत दिवसभर, तर काहींना अवघे २ घंटे पाणी उपलब्‍ध होते. शहरातील पाणी वितरणाची व्‍यवस्‍था सुधारण्‍यासाठी २ सहस्र १०० कोटी रुपये व्‍यय करून समान पाणीपुरवठा योजनेचे काम चालू केले आहे. ३ वर्षांत या योजनेचे अनुमाने ६५ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. पुढील वर्षभरात महापालिकेला ही योजना पूर्ण करण्‍याचे आव्‍हान आहे. पाणीपुरवठा विभागाला प्रतीमाणसी १५० लिटरपेक्षा अधिक पाणी वापर होत असल्‍याचे ८ सहस्र ग्राहक आढळून आले आहेत. त्‍यापैकी ४ सहस्र ६०० जणांना नोटिसा पाठवून ‘पाणी वापर अल्‍प करा, अन्‍यथा कारवाई केली जाईल’, अशी चेतावणी देण्‍यात आली आहे. उर्वरित नागरिकांनाही अशा नोटिसा पाठवल्‍या जाणार आहेत, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

संपादकीय भूमिका

अतिरिक्‍त पाणी वापरणार्‍यांना केवळ नोटिसा देऊन न थांबता त्यांचा पुढील पाठपुरावाही करावा !