वादग्रस्त विनोदी कलाकार वीर दास यांचा बेंगळुरू येथील कार्यक्रम रहित !

हिंदूंच्या संघटित लढ्याचा परिणाम !

वादग्रस्त विनोदी कलाकार वीर दास

बेंगळुरू (कर्नाटक) – मल्लेश्‍वरम् येथील चौडय्या मेमोरियल हॉलमध्ये ११ नोव्हेबर या दिवशी होणारा वादग्रस्त विनोदी कलाकार वीर दास याचा ‘वीर दास कॉमेडी शो’ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या विरोधामुळे रहित करण्यात आला. वीर दास याने यापूर्वी हिंदु धर्म, हिंदु महिला आणि भारत यांचा अपमान केला होता. आताच्या कार्यक्रमाविषयी हिंदु जनजागृती समिती आणि श्रीराम सेना यांनी वैयाल कावल पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. यासह हिंदु जागरण वेदिकेकडून १० नोव्हेंबरला आंदोलन करण्यात आले. अशा प्रकारे हिंदूंनी दिलेल्या संघटित लढ्यामुळे चौडैय्या मेमोरिअल हॉलचे पदाधिकारी आणि आयोजक यांनी हा कार्यक्रम रहित केला.

हिंदुद्वेषी प्रवृत्तींचे कार्यक्रम न होण्यासाठी वैध मार्गाने विरोध चालूच ठेवणार ! – सुनील घनवट, राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

मुंबई – अशा हिंदुद्वेषी प्रवृत्तींचे कार्यक्रम यापुढे होऊ नयेत, या दृष्टीने वैध मार्गाने आमचा विरोध चालूच ठेवू. याविषयी सहभागी सर्व संघटना आणि कार्यकर्ते यांचे आभार मानून ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करत आहोत, असे विधान हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.

श्री. घनवट पुढे म्हणाले की, विनोदाच्या नावाखाली सातत्याने हिंदूंच्या देवता आणि श्रद्धास्थाने यांची निंदानालस्ती करणे, याला आजकाल ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ आणि ‘कलास्वातंत्र्य’ म्हटले जाते. या दोन्ही स्वातंत्र्याचा बुरखा पांघरून खरेतर यांना हिंदुद्वेष पसरवायचा असतो, हेच यातून दिसून येते. निखळ विनोद करून समाजाला हसवणे, हे अल्प होऊन हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा, हिंदु संस्कृती, धार्मिक कृती, धर्मग्रंथ, देवता आदींचा ‘कॉमेडी’साठी वापर होत आहे. अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी कुणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास त्यांवर त्वरित कारवाई होते, ‘सर तन से जुदा’च्या (डोके शरिरापासून वेगळे करण्याच्या) धमक्या दिल्या जातात; मात्र हिंदूंच्या श्रद्धास्थानांची कुणीही टिंगलटवाळी करतो. हिंदूंनी हे किती दिवस सहन करावे ? यापुढे हिंदु समाज श्रद्धास्थानांचा अवमान सहन करणार नाही.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंनो, या यशाविषयी ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !
  • हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान करणार्‍यांचे कार्यक्रम हिंदूंकडूनच आयोजित केले जातात, हे हिंदूंना लज्जास्पद आहे. ज्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये ईशनिंदेच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा आहे, तशी शिक्षा असणारा कायदा भारतातही असणे आता आवश्यक आहे. तरच हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान रोखला जाईल !