आंदोलनाला वैध मार्गाने विरोध करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना धक्काबुक्की

पू. भिडेगुरुजी यांच्या विधानाच्या निषेधार्थ पुणे येथे महिला अधिवक्त्यांचे आंदोलन

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

पुणे, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयासमोर काही महिला अधिवक्त्यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी पू. संभाजी भिडेगुरुजींच्या विरोधात हातात फलक घेऊन घोषणा देत आंदोलन केले. पू. भिडेगुरुजींनी काही दिवसांपूर्वी एका महिला पत्रकाराला ‘तिने कुंकू लावले, तरच तिच्याशी बोलीन’, असे वक्तव्य केले होते. या आंदोलनाच्या वेळी पू. भिडेगुरुजींना ‘जातीविरोधी’ आणि ‘मनुवादी’ संबोधण्यात आले. त्यांचा एकेरी नावानेही उल्लेख करण्यात आला. (यातून वयोवृद्ध व्यक्तीचा असा उल्लेख करणार्‍या या तथाकथित ‘सुशिक्षित’ महिला अधिवक्त्यांवर कोणता संस्कार झाला असेल ? हे लक्षात येते ! – संपादक) या वेळी त्यांना हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कपिल राठोड यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केल्यावर महिला अधिवक्त्यांनी ‘आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे’, असे सांगत अधिवक्ता राठोड यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलन थांबवले; मात्र आंदोलनकर्त्या महिलांनी राठोड यांना धक्काबुक्की करून, तसेच अटी-शर्तींचा भंग करूनही पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. (यावरून ‘आंदोलनाला पोलिसांची फूस होती’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)

कुंकू लावणे ही हिंदु संस्कृती असतांना महिलांनी कुंकू लावणे चुकीचे कसे ? – हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कपिल राठोड यांचा आंदोलनकर्त्या अधिवक्त्यांना प्रश्न

न्यायालयात गोरक्षकांची बाजू ठामपणे मांडणारे अधिवक्ता कपिल राठोड यांनी या वेळी आंदोलनाला विरोध करत घोषणा दिल्या. ‘टिकली लावणे वाईट आहे का ?, माझी आई कुंकू लावते. ही आपली हिंदु संस्कृती आहे, मग महिलांनी कुंकू लावणे चुकीचे कसे ?’, असे प्रश्नही त्यांनी आंदोलनकर्त्या महिलांना विचारले. या प्रसंगी तेथे गोरक्षक ऋषिकेश कामठे हेही उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

वैध मार्गाने विरोध करणार्‍या अधिवक्त्यांना थेट न्यायालयाच्या समोर धक्काबुक्की करणार्‍या महिला अधिवक्त्या कायदाद्रोहीच होत ! न्यायालयाने त्यांची सनद काढून घेतली पाहिजे, असेच नागरिकांना वाटते !

विधानासारख्या गोष्टींच्या विरोधात न्यायालयासमोर आंदोलन करता येते का ?, हे जनतेला समजले पाहिजे !

कुंकू लावण्यास सांगितल्याच्या विरोधात आंदोलन करणार्‍या महिला अधिवक्त्यांनी कधी ‘हलाला’, ‘तिहेरी तलाक’, तसेच लव्ह जिहाद, हुंडाबळी यांविषयी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन केले आहे का ?