संभाजीनगर येथे मुलीला जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर सामूहिक अत्याचार !

५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !

संभाजीनगर – येथे मुलीला जिवे मारण्याची धमकी देत ३ नराधमांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. शहरातील शेंद्रा परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिसांनी ५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. आरोपी हे बीड जिल्ह्यातील असून महिलेवर अत्याचार केल्यानंतर ते पसार झाले आहेत. त्यांच्या शोधात चिकलठाणा पोलिसांनी विविध पोलिसांची पथके रवाना केली आहेत.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी मुलीला जिवे मारण्याची धमकी देत पीडितेला शेंद्रा परिसरात असलेल्या एका लॉजवर नेले. २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ३ नोव्हेंबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत ३ आरोपींनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याविषयी कुणाला सांगितल्यास आरोपींनी महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकारानंतर आरोपींच्या तावडीतून महिलेने कशीबशी सुटका करत थेट चिकलठाणा पोलीस ठाणे गाठले. स्वतःच्या समवेत घडलेला सर्व प्रकार पीडितेने पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी ३ नराधमांसह एकूण ५ जणांवर बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका

महिला असुरक्षित असणे चिंताजनक आणि संतापजनक !