पाकमध्ये आर्थिक संकटामुळे अराजकता निर्माण होऊन सैन्याचे शासन लागू होण्याची शक्यता ! – पाकमधील नियतकालिकाचा दावा

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील ‘द फ्रायडे टाइम्स’ या साप्ताहिकाने दिलेल्या वृत्तामध्ये अराजकतेची स्थिती निर्माण झाल्यास येत्या काही दिवसांमध्ये पाकमध्ये ६ मास किंवा त्याहून अल्पकाळासाठी ‘मार्शल लॉ’ (सैन्याचे शासन) लागू होण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे.

या वृत्तात म्हटले आहे की, इम्रान खान यांना सत्तेतून हटवण्यामागे त्यांना आर्थिक परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश आणि वाढती महागाई, ही प्रमुख कारणे होती; मात्र नवीन सरकार आल्यानंतरही यात काहीच पालट झालेला नाही. त्यातही देशात महापूर आल्यानंतर संकट अधिक गडद झाले आहे. अशा वेळी इम्रान खान देशात आझादी मोर्चा काढून सरकारला आव्हान देत आहेत. या पार्श्‍वभूमीवर देशात अराजकता निर्माण होऊ शकते. त्यामुळेच सैन्याला हस्तक्षेप करावा लागू शकतो.