‘वंदे भारत एक्सप्रेस’चे प्राण्यांना धडकल्याने एका मासात झाले ३ अपघात !

कर्णावती (गुजरात) – देशाची सर्वांत वेगवान रेल्वे असणार्‍या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला २९ ऑक्टोबरला पुन्हा अपघात झाला. मुंबईहून कर्णावतीकडे जातांना तिची गुजरातमध्ये एका बैलाला धडक बसली. त्यात रेल्वेचा समोरील भाग तुटला. अर्ध्या घंट्याच्या विलंबानंतर ती पुन्हा नियोजित स्थळी मार्गस्थ झाली. गेल्या मासाभरात या रेल्वेचे प्राण्यांना धडकल्यामुळे ३ अपघात झाले आहेत.

१. ७ ऑक्टोबरला गुजरातमधील आणंद येथे एका गायीला, तर ६ ऑक्टोबर या दिवशी म्हशींच्या एका कळपाला या गाडीची धडक बसली होती. यात ४ म्हशींचा मृत्यू झाला होता.

२. देशाची पहिली ‘हायस्पीड रेल्वे’ वंदे भारत एक्सप्रेस सध्या ३ मार्गांवर धावत आहे. देहली ते वाराणसी, देहली ते जम्मू-काश्मीरमधील कटरा आणि गुजरातच्या गांधीनगरहून मुंबई या मार्गावर ही रेल्वेसेवा चालू आहे. या रेल्वेचा वेग १८० किमी प्रतिघंटा आहे.

संपादकीय भूमिका

अशा अपघातांनी भारताची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित योग्य उपाययोजना काढणे आवश्यक !