कराड, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – पाटण, कोयनानगर, चिपळूण शहरे, तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना प्रवाशांच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती बसस्थानक अशी ओळख असणार्या कराडच्या बसस्थानकाची दुरवस्था अनेक समस्यांमधून पहायला मिळत आहे.
या ठिकाणी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच नोकरदार प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सध्या दीपावली सणाच्या निमित्ताने गावाकडे ये-जा करणार्या प्रवाशांची संख्याही पुष्कळ वाढत आहे. असे असतांना या ठिकाणी प्रवाशांना बसण्याकरता पुरेशी बाकडी उपलब्ध नाहीत. बाकड्यांची पडझड झाली असून कित्येक मास झाले तरी त्या ठिकाणी बसण्याकरता व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी बसची वाट पहातांना प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागते. एवढा त्रास सहन करूनसुद्धा पुन्हा एस्.टी. मध्ये बसायला मिळेल का ? याचीही शाश्वती नसते. याचा सर्वांत अधिक त्रास ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. बसस्थानकात बसण्याची व्यवस्था नसणे, हीच मोठी शोकांतिका आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी बसस्थानकाच्या दुतर्फा थंड पाण्याचे ‘कूलर’ ठेवण्यात आलेले आहेत; मात्र गेले काही मास ते बंद अवस्थेत असून त्याला गंज लागलेला आहे. बसस्थानकाच्या आवारात, तसेच अधिकार्यांच्या कार्यालयाच्या बाहेर, जिन्यामध्ये तंबाखू, गुटखा सेवन करून आणि थुंकून भिंती रंगवलेल्या पहायला मिळत आहेत. मद्यपान करून भीक मागत फिरणार्या व्यक्तींचाही सामना प्रवाशांना करावा लागतो. याचसमवेत या बसस्थानकात भुरट्या चोरांचा सुळसुळाट असून प्रवाशांचे मौल्यवान दागिने, भ्रमणभाष यांची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याचा फटका स्वतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही बसलेला आहे. त्यांच्या पत्नीची पर्स या ठिकाणी चोरी झाली होती; मात्र काही कालावधीत पोलिसांनी अन्वेषण करून ती परत मिळवून दिलेली होती. या प्रसंगाची नोंद सर्व वृत्तपत्रांनी घेतलेली होती.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्याचप्रमाणे कराड दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत येथील बसस्थानकाचे नव्याने बांधकाम करण्याची संमती प्राप्त झाली होती. त्यासाठी निधीही देण्यात आलेला होता. काही वर्षांपूर्वीच बांधलेल्या बसस्थानकाची दुरवस्था झाली असून संबंधित अधिकार्यांनी प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करून त्याची कार्यवाही वेळीच करणे आवश्यक आहे.