उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. वैदेही मनोज खाडये ही या पिढीतील एक आहे !
‘आश्विन कृष्ण चतुर्थी (१३.१०.२०२२) या दिवशी कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील कु. वैदेही मनोज खाडये हिचा १६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. वैदेही मनोज खाडये हिला १६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले ‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
‘कु. वैदेही मनोज खाडये उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून वर्ष २०१६ मध्ये ती ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ५४ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१२.१०.२०२२) |
१. धर्माचरणाची आवड
‘वैदेहीला मधोमध भांग पाडून वेणी घालणे, कुंकू लावणे, बांगड्या घालणे, पैंजण घालणे इत्यादी धर्मपालनाच्या गोष्टी फार आवडतात. आश्रमात आणि घरी ती या गोष्टींचे पालन करते.
२. निर्मळ
काही वेळा काही प्रसंगांत माझ्याकडून कु. वैदेहीवर चिडचिड होते; परंतु थोड्या वेळाने ती स्वतःहून माझ्याशी बोलायला येते. ‘पुन्हा असे करणार नाही’, असे म्हणून ती मला मिठी मारते. तेव्हा तिच्या मनाची निर्मळता लक्षात येते आणि चिडचिड झाल्यामुळे वातावरणात निर्माण झालेला दाबही अल्प होतो.
३. इतरांचा विचार
एकदा जिल्ह्यातील एक युवा साधक कुडाळ सेवाकेंद्रात रहायला आला होता. त्याचा स्वभाव अबोल होता. तेव्हा त्याच्याशी मालवणी भाषेत बोलून वैदेही त्याला एकटेपणा जाणवू देत नव्हती.
४. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
वैदेही नामजपादी उपाय करते. ती सेवाकेंद्रातील व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगाला नियमितपणे उपस्थित राहून आढावा देण्याचा प्रयत्न करते. ती सेवाकेंद्रातील कार्यपद्धतींचे पालन करण्याचा प्रयत्न करते. मध्यंतरी तिच्याकडून काही चुका झाल्या होत्या. तिला त्यांची जाणीव करून दिल्यावर तिने त्या चुका लिहून फलकावर लावल्या.
५. सेवेची ओढ
अ. सेवाकेंद्रात करत असलेला सकाळचा प्रसाद (न्याहारी) करायला शिकता येण्यासाठी थंडीचे दिवस असतांनाही वैदेहीने सलग दोन आठवडे सेवाकेंद्रात प्रसाद करण्याची सेवा केली.
आ. वैदेही सेवाकेंद्रातील काही साधकांच्या समवेत जिल्ह्यातील प्रसारातील जिज्ञासूंना संपर्क करण्याच्या सेवेसाठी गेली होती. तेव्हा ती पुष्कळ उत्साही होती. तिने संपर्क सेवेत चांगले प्रयत्न केले.
इ. गेल्या २ – ३ आठवड्यांपासून वैदेही जिल्ह्यातील बालसाधकांचा ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग घेण्याची सेवा करत आहे.
ई. वैदेही तिच्या ओळखीच्या काकू आणि मित्र-मैत्रिणी यांना त्यांच्या स्थितीनुसार साधना सांगते.
६. आईला साधनेत साहाय्य करणे
अ. एका प्रसंगात माझी चिडचिड होत होती. त्यामुळे वैदेही आणि यजमान यांच्या समवेत बाहेर जाण्यास मी नकार दिला. तेव्हा वैदेही मला नेमकेपणाने म्हणाली, ‘‘आई, तू अपेक्षांच्या विचारांत का अडकतेस ? जे समोर आहे, ते स्वीकारून आनंद घे.’’ त्यानंतर मी त्यांच्या समवेत गेल्यावर नकारात्मक स्थितीतून बाहेर आले.
आ. माझ्याकडून काही चुका होतात. तेव्हा मी वैदेहीशी बोलल्यावर ती मला वेगवेगळे प्रश्न विचारते आणि मला चुकीच्या मुळाशी नेते. त्यामुळे मला साधनेत साहाय्य होते. मला ती मार्गदर्शक गुरु वाटते. तसे तिला सांगितल्यावर ती मला म्हणते, ‘‘आई, आपण गुरुभगिनी आहोत.’’
इ. माझ्या मनात अनेक विचार असल्यास वैदेही ते अचूक ओळखते. ती मला म्हणते, ‘‘आई, कसले विचार करतेस ? तुझ्या मनात येत असलेले विचार मला सांग.’’ त्यानंतर माझ्या मनातील विचार मी तिला सांगितल्यावर मला हलकेपणा जाणवतो आणि मी त्या विचारचक्रातून बाहेर येते.
७. भाव
अ. दळणवळण बंदीपासून प्रतिदिन पहाटे ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप होता. त्या वेळी आठवड्यातून एकदा वैदेही प्रार्थना, कृतज्ञता आणि भार्वाचना सांगत असे.
आ. वैदेहीला देवाविषयी कविता सुचतात.
इ. ‘केक’ करायला शिकल्यावर वैदेहीने सेवाकेंद्रातील साधकांसाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचे केक करून नेले. ‘सेवाकेंद्रातील साधकांनी ‘केक’ खाल्ला, म्हणजे तो परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच खाल्ला’, असा तिचा भाव होता.
ई. ‘सद्गुरु सत्यवानदादांकडून पुष्कळ शिकायला मिळते’, असे ती मला घरी आल्यावर वेळोवेळी सांगते. ‘सद्गुरु सत्यवान कदम यांच्या रूपाने परात्पर गुरु डॉक्टरच सत्संगाला उपस्थित असतात’, असा तिचा भाव असतो.
८. स्वभावदोष
सवलत घेणे, चालढकलपणा, स्वतःच्या मतावर ठाम रहाणे, तत्परतेचा अभाव, आळशीपणा आणि अव्यवस्थितपणा.’
९. कृतज्ञता आणि प्रार्थना
हे भगवंता, तुझ्याच कृपेने मला वैदेहीसारख्या दैवी साधिकेला सांभाळण्याची संधी मिळाली आहे. मला तिच्याकडून ‘प्रेमभाव, इतरांचा विचार करणे’ इत्यादी गुण शिकायला मिळत आहेत. ‘तिला सांभाळणे आणि घडवणे’, ही माझी साधना आहे अन् ते केवळ आपल्याच कृपेने शक्य होणार आहे’, याची मला सतत जाणीव राहू दे’, अशी आपल्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’
– सौ. मंजुषा मनोजकुमार खाडये (आई), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग (१८.५.२०२२)
देवा, आश्रय चरणी कधी रे देशील ।तव स्मरण होता भाव दाटतो । हृदयी देवा कधी रे वसशील । मज आपले होऊ द्या गुरुदेवा । श्री गुरुचरणी कृतज्ञता !’ – कु. वैदेही मनोज खाडये (२८.३.२०२२) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |