‘दर्द से हमदर्द तक’ या विधी साहाय्य संस्थेची मागणी
मुंबई – सप्टेंबर २०२२ मध्ये बालसुधारगृहातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलींची नावे उघड करणार्या अधिकार्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘दर्द से हमदर्द तक’ या विधी साहाय्य संस्थेने ७ ऑक्टोबर या दिवशी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्राची प्रत संस्थेने राष्ट्रीय महिला आयोग, बालहक्क आयोग आणि गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही पाठवली आहे.
या गुन्ह्याची प्रत पोलीसदलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून मुलींची ओळख उघड करणे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक निर्देशाचे आणि पोक्सो कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. यासाठी १ वर्षाची शिक्षा आहे. त्यामुळे ‘७ दिवसांच्या आत संकेतस्थळावरून संबंधित प्रत हटवावी, तसेच ती प्रत प्रसिद्ध करण्यासाठी जे अधिकारी उत्तरदायी आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला या प्रकरणी न्यायालयात धाव घ्यावी लागेल’, अशी चेतावणी संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांनी दिली आहे.