आळंदी (पुणे) येथील मृदुंग, संगीत महोत्सव आणि गुरुपूजन सोहळा
आळंदी (जिल्हा पुणे) – वारकरी संप्रदाय ही मोठी शक्ती असून या संप्रदायाने भजन आणि कीर्तन यांच्या माध्यमातून मानवकल्याण आणि विश्वशांती यांचा संदेश दिला. ही एक ज्ञान आराधना असून त्यात भक्ती आणि ज्ञानोपासना यांचा संगम आहे. मानवाला सद्विचार देणारा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे वैभव आहे, असे प्रतिपादन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आळंदी येथे मृदुंगज्ञान शिक्षण संस्था आयोजित पं. दासोपंतस्वामी आळंदीकर यांनी ८ ऑक्टोबर या दिवशी मृदुंग, संगीत महोत्सव, गुरुपूजन सोहळा यांचे अमृतनाथ स्वामी संस्थेमध्ये आयोजन केले होते. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, पंढरपूरचा विशेष कृती आराखडा सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वारकर्यांना सर्व सुविधा मिळाव्यात आणि परिसर स्वच्छ रहावा, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. देहू-आळंदीचाही याच पद्धतीने विकास करायचा आहे. इंद्रायणी नदी स्वच्छ करण्यासाठी प्रशासनाला सूचना करण्यात येतील.
शिंदे यांनी प्रथम माऊली मंदिरात जाऊन संत ज्ञानेश्वर समाधीचे दर्शन घेऊन समाधीचे विधीवत् पूजन केले. त्यानंतर देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच त्यांनी मृदुंग दिंडीमध्ये पायी चालत सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पं. दासोपंत स्वामी आळंदीकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शांतिब्रह्म मारुति महाराज कुरेकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते.