सातारा – काससारख्या संवेदनशील भागात शासनाने आयोजित केलेल्या विकास महोत्सवाकडे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थ यांसह पर्यटकांनीही पाठ फिरवली आहे. ‘कास महोत्सवा’च्या उद्घाटनाला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सोडले, तर या मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, तसेच इतर लोकप्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थ यांनीही पाठ फिरवली. मोजके शासकीय अधिकारीच या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईही ‘कास महोत्सवा’ला उपस्थित नव्हते. अटाळी या गावी सातारा प्रशासन, वन विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या वतीने कास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवासाठी जागा सपाटीकरण करतांना २५० च्या वर छोटी-मोठी झाडे तोडून जागा सिद्ध करण्यात आली. महोत्सवांमध्ये नृत्य, गाणी, ‘लेझर शो’ यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डीजे लावून कास परिसर दणाणून सोडण्यात आला. पर्यटकांनी या महोत्सवाकडे पाठ फिरवल्यामुळे उद्घाटनाच्या वेळी मंडपामध्ये केवळ रिकाम्या खुर्च्याच बघायला मिळाल्या.