‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त देवाचे चैतन्य कार्यरत असल्याविषयी आलेली अनुभूती

श्री. श्रीराम लुकतुके

१. अधिवेशनात भाषण करण्यापूर्वी एका संतांना पुष्कळ त्रास होत असल्याने त्यांनी पोडियमसमोर उभे न रहाता आसंदीवर बसूनच भाषण करणे

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त एक स्त्री संत आल्या होत्या. त्या अधिवेशन स्थळी आल्या, तेव्हा ‘त्यांना पुष्कळ शारीरिक कष्ट होत आहेत’, असे लक्षात आले. त्यांना चालणेही कठीण होत होते आणि त्यांचा चेहराही थोडा काळसर दिसत होता. त्या पोडियमसमोर उभे राहून बोलू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी व्यासपिठावर आसंदीवर बसूनच भाषण केले. (पोडियम म्हणजे व्यासपिठावर ध्वनीवर्धकावरून भाषण करण्यासाठी वक्त्यांकरता ठेवलेले उभे लाकडी पटल.)

२. भाषण केल्यावर काही मिनिटांतच त्यांचा चेहरा उजळणे आणि त्यांनी ‘अधिवेशनातील आध्यात्मिक सामर्थ्य आणि साधना यांमुळेच माझा सर्व त्रास न्यून झाला आहे’, असे सांगणे

त्यांचे भाषण संपले आणि काही मिनिटांतच त्यांचा चेहरा एकदम उजळला अन् त्यांच्या चेहर्‍यावर हास्य दिसू लागले. पुढील वक्त्यांचे भाषण संपल्यावर त्या संत उठल्या आणि पोडियमसमोर उभे राहून त्यांनी सांगितले, ‘‘माझी गुडघेदुखी आता पूर्णपणे थांबली आहे आणि अन्य शारीरिक कष्टही एकदम उणावले आहेत. इथे असलेले आध्यात्मिक सामर्थ्य आणि साधना यांमुळेच हे होऊ शकले आहे.’’

३. त्या संतांचे भाषण करण्यापूर्वीचे छायाचित्र आणि भाषण केल्यानंतरचे छायाचित्र पाहिल्यावर त्यांच्यातील हा पालट स्पष्टपणे जाणवत होता.

४. वरील अनुभूतीतून ‘देवाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी कार्याची अनुभूती आणि सामर्थ्य संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे’, असे वाटणे

अधिवेशनामध्ये सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक प्रतिदिन सूक्ष्म परीक्षण सांगत असत. ‘सामान्य व्यक्तीला सूक्ष्मातून काय घडते ?’, ते कळणे कठीण आहे. या प्रसंगात अधिवेशनात आलेल्या माझ्यासारख्या सामान्य जिवाला स्थुलातून चैतन्य कार्यरत असल्याचे प्रत्यक्ष डोळ्यांनी पहायला आणि अनुभवायला मिळाले. जणू ‘देवाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अवतरित झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी कार्याची अनुभूती आणि त्यांचे सामर्थ्य संपूर्ण जगाला दाखवून दिले अन् ‘अंतिम विजय भगवंताचाच आहे’, याविषयी आश्वस्त केले’, असे मला वाटले.

५. प्रार्थना

‘परात्पर गुरुदेव, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या या दैवी यज्ञामध्ये आम्हाला समर्पित करून घ्यावे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’

– श्रीहरीचा दास,

श्री. श्रीराम लुकतुके, देहली सेवाकेंद्र (२२.६.२०२२)