‘दसर्याच्या दिवशी एकमेकांना सोने (आपट्याची पाने) देतात. एकमेकांना नमस्कार करून मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. आज (१५.१०.२०२१ या दिवशी) दसर्याच्या निमित्ताने आश्रमातील काही साधकांनी मला शुभेच्छा दिल्या. एका साधकाचा ‘आपल्याला आज परात्पर गुरु डॉक्टरांनी मानस सोने दिले आहे’, असा भाव होता. त्या वेळी मला असे वाटले की, देवाने तर आपल्या (साधकांच्या) जीवनाचे सोनंच केले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेले मानस सोनं म्हणजे निर्गुण, निराकार परब्रह्माची अनुभूती होय. साधकांकडून मिळालेल्या शुभेच्छा म्हणजे आजच्या (साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या) शुभदिनी देवतांनी साधनेसाठी दिलेला आशीर्वाद आहे. साधक आणि कुटुंबीय यांच्याकडून एकमेकांना शुभेच्छा देणे, हे देवाच्या प्रीतीचे मूर्तीमंत रूप आहे.
आजच्या दिवशी हे सोनं देणे, म्हणजे झाले-गेले सर्व विसरून एकमेकांची मने जुळणे होय ! आपुलकीने आणि प्रेमभावाने वागणे, तसेच सर्वांशी एकोप्याने वागून संघटितपणा वाढवणे, असे अनेक गुण या दिवसांत आत्मसात करता येतात.
दिवस आहे सोन्याचा गं ।
तीन मुहूर्तांपैकी एक दसरा हा सण गं ।
नवरात्रीचे नऊ दिवस आई येईल धावून गं ।
सर्वांना मिळे आई भगवतीचा सत्संग ।
बालगोपाळांस चाखण्या देई भावभक्तीमय अमृत गं ।। १ ।।
स्वभावदोष अन् अहं यांचे गाठोडे बांधून ।
अग्नीत करू आता त्यांचे विसर्जन ।
गुणवृद्धी वाढवण्यास संधी आली चालून ।
आई भवानीच्या कृपेस पात्र होऊ अजून ।। २ ।।
अवतरली आई, साधनेसाठी दिशा देण्यास ।
साधकांना भक्तीसत्संगात दर्शन देण्यास ।
नेईल भवसागरी डुंबवून, भावमय असे गं रस ।
करू प्रार्थना पकडून तिचे चरण, करी तू हृदयात वास ।। ३ ।।
भक्तीचे असे गंध, चरणांचे असे तीर्थ ।
आई, ये ना गं लवकर, श्रद्धा वाढव ना सत्वर ।
कृतज्ञताभावाने लीन करून घे गं ।
आलो तुझ्या चरणी शरण, शरण, शरण गं ।। ४ ।।
सोनेरी हे क्षण गं, सोनेरी हे क्षण गं ।
आजचा दिवस आहे सोन्याचा गं ।
सर्वत्रच आहे सोनेच सोने गं ।
दिवस आहे हा सोनेरी (दसर्याचा) गं ।। ५ ।।
– कु. प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१०.२०२१)