पाश्‍चात्त्य देशांनी भारतासारख्या देशांना लुटले !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची स्पष्टोक्ती

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

मॉस्को (रशिया) – पाश्‍चात्त्यांनी भारतासारख्या देशांना सत्य, स्वातंत्र्य आणि न्याय यांच्या विरोधात जाऊन त्यांची लूट केली. पाश्‍चात्त्यांनी मध्ययुगामध्ये स्वतःच्या वसाहतवादी धोरणाला प्रारंभ केला आणि नंतर गुलामांचा व्यापार, अमेरिकेतील रेड इंडियन यांचा नरसंहार, भारत अन् आफिका या खंडातील देशांची लूट, तसेच चीनच्या विरोधात युद्धात सहभाग घेतला. पाश्‍चात्त्य देश जाणीवपूर्वक जमातींना पूर्ण नष्ट करत आहेत. त्यांनी भूमी आणि साधने यांच्यासाठी जनावरांप्रमाणे लोकांची शिकार केली, अशा कठोर शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्‍चात्त्य देशांवर टीका केली. रशियाने युक्रेनच्या डोनेत्स्क, लुहान्स्क, खेरसॉन आणि जपोरिज्जिया या ४ भागांना अधिकृतरित्या रशियाला जोडल्याच्या घोषणेच्या वेळी ते बोलत होते.

पुतिन पुढे म्हणाले की, पाश्‍चात्त्य देश कोणत्याही देशांत क्रांती भडकवण्यासाठी सिद्ध आहेत. स्वतःचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ते कोणत्याही देशाला आगीमध्ये ढकलण्यासाठी सिद्ध आहेत.

संपादकीय भूमिका

हे सत्य किती भारतीय नेते भारतियांच्या मनावर बिंबवतात !