सरसंघचालकांना ‘राष्ट्रपिता’ संबोधणार्‍या इमामांना इंग्लंड आणि पाकिस्तान येथून शिरच्छेद करण्याच्या धमक्या  

(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा)

‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख उमर अहमद इलियासी व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नवी देहली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना काही दिवसांपूर्वी ‘राष्ट्रपिता’ असे संबोधणारे ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख उमर अहमद इलियासी यांना शिरच्छेद करण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. २३ सप्टेंबरपासून इंग्लंड आणि पाकिस्तान यांसह भारतातील अनेक भागांतून शेकडो दूरभाष करून या धमक्या देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर देहलीतील टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘मी या धमक्यांना घाबरणार नाही किंवा झुकणार नाही’, असे इलियासी यांनी स्पष्ट केले आहे.

सरसंघचालकांनी सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाळ, अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल आणि ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांच्यासह मशिदीमध्ये जाऊन उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली होती. तेव्हापासून इमाम उमर अहमद इलियासी यांना धमक्या मिळत आहेत. त्यामुळे त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रहित केले आहेत.