रिझर्व्ह बँकेने रेपो दर ०.५० टक्क्यांनी वाढवला

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास

नवी देहली – भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे रेपो दर ५.४० टक्क्यांवरून ५.९० टक्के होणार आहे. यामुळे गृह, वाहन, वैयक्तिक आदी कर्ज महाग होणार आहेत. यामुळे कर्जदारांना अधिक ‘ई.एम्.आय.’ (सममूल्य मासिक हप्ता) भरावा लागणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास पत्रकार परिषदेत व्याजदरांविषयी माहिती दिली. ऑगस्टमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर ४.९० टक्क्यांवरून ५.४० टक्के करण्यात आले होता.

०.५० टक्क्यांच्या वाढीमुळे काय होणार ?

एका व्यक्तीने ८.०५ टक्के दराने २० वर्षांसाठी ३० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले, तर त्याला त्याच्या कर्जाचा ‘ई.एम्.आय.’ आता २५ सहस्र १८७ रुपये असेल. म्हणजेच त्याला ३० लाख रुपयांऐवजी एकूण ६० लाख ४४ सहस्र ७९३ रुपये द्यावे लागतील. पूर्वी हीच रक्कम ७.९५ दराने २० वर्षांत ५८ लाख ४२ सहस्र रुपये द्यावे लागत होते.

‘रेपो रेट (दर)’ म्हणजे काय ?

ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतात त्या दराला ‘रेपो रेट (दर)’ म्हणतात. रेपो दर वाढणे, म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणार्‍या कर्जदरात वाढ होणे. रेपो दर अल्प होणे, म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणे. याचाच अर्थ रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली, तर सामान्यांच्या कर्जात वाढ होते.