मदुराई (तमिळनाडू) येथे रा.स्व. संघाच्या नेत्याच्या घरावर पेट्रोल बाँब फेकले !

पी.एफ्.आय.वरील धाडींनंतर संघ आणि भाजप नेत्यांच्या घरांवर आक्रमणाचे वाढते प्रकार !

मदुराई (तमिळनाडू) – येथील पट्टानाडी भागात २४ सप्टेंबरला सायंकाळी अज्ञाताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते कृष्णन् यांच्या घरावर ३ पेट्रोल बाँब फेकले; मात्र  या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. पेट्रोल बाँब फेकणारा नंतर पसार झाला. राज्यात संघाच्या सदस्यांना लक्ष्य केले जात आहे. एकाच दिवसातील ही दुसरी घटना आहे. याआधी चेन्नईजवळील तांबरम् येथे संघाच्या नेत्याच्या घरावर पेट्रोल बाँब फेकण्यात आला होता.

तमिळनाडूतील कुनियामुथूर शहरातील भाजपचे कार्यकर्ते सरथ यांच्या घरावर २३ सप्टेंबर या दिवशी पेट्रोल बाँब फेकण्यात आला होता. यात एका चारचाकी गाडीची हानी झाली होती. त्याच्या एक दिवस आधी भाजपच्या कार्यालयावर पेट्रोल बाँब फेकण्यात आला होता. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पी.एफ्.आय.च्या) ठिकाणांवर धाडी घातल्यानंतर पेट्रोल बाँब फेकण्याच्या घटना वाढल्या आहेत. तमिळनाडूच नाही, तर केरळमध्येही भाजपच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.