‘एन्.आय.ए.’च्या महाराष्ट्रातील धाडीत १६ जण कह्यात !

मुंबई – महाराष्ट्रातून १६ जणांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर, जळगाव, मालेगाव, संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी इत्यादी ठिकाणी कारवाई केली.

१. संभाजीनगर येथील जिन्सी भागातून चौघांना आणि परभणीतून चौघांना कह्यात घेण्यात आले.

२. मालेगाव येथून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा येथील प्रमुख सैफू रहेमान याला कह्यात घेतले आहे. तो या संघटनेचा नाशिक जिल्हाप्रमुख असून संघटनेचा राज्य पदाधिकारी म्हणूनही दायित्व पहात होता. त्याच्या घरावर टाकलेल्या धाडीत काही आक्षेपार्ह लिखाण असलेली पुस्तके जप्त करण्यात आली.

३. कोल्हापूर येथे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, अंमलबजावणी संचालनालय आणि आतंकवादविरोधी पथक यांनी एकत्रितपणे केलेल्या कारवाईत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या दोघा सदस्यांना येथून कह्यात घेतले आहे. ही कारवाई येथील जवाहरनगर येथे करण्यात आली. कह्यात घेतलेल्या संशयितांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

४. जळगाव येथील मेहरुण परिसरातून अकोला येथील आतंकवादविरोधी पथकाने तिघांना कह्यात घेतले. ते तिघे एका मशिदीच्या जवळ झोपले होते. यांतील दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. कह्यात घेतलेला अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (वय ३२ वर्षे) हा मूळचा जालना येथील असून गेल्या काही दिवसांपासून तो जळगाव येथे लपून बसला होता. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नवी मुंबईत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यालय !

नवी मुंबईतील नेरुळमधील दारावे गावातील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यालयावर धाड टाकण्यात आली. या वेळी ४ जणांना कह्यात घेतले. या परिसरात दैनंदिन गरजा भागवणारी दुकाने आहेत; पण संघटनेच्या कार्यालयात संगणकावर काम करणारे ६ – ७ जण येथील कुणाशीही बोलत नाहीत, अशी माहिती एका व्यक्तीने दिली.