एकाच विषयावरील दोन न्यायाधिशांचे भिन्न निवाडे !

१. न्यायालयाने तळोजा कारागृहातील बंदीवान गौतम नवलखा यांना मच्छरदाणी वापरण्याची अनुमती नाकारणे

‘मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंदीवान असलेले ‘एल्गार परिषदे’चे गौतम नवलखा आणि दुसरा आरोपी सागर गोरखे यांनी कारागृहात मच्छरदाणी (डासांचा उपद्रव होऊ नये, यासाठी झोपतांना बांधण्याची जाळी) मिळावी, यासाठी मुंबई विशेष न्यायालयात आवेदन दिले होते. अशाच प्रकारची मागणी याच कारागृहातील बंदीवान अन् अँटेलिया स्फोटके प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील माने यांनीही केली होती. दोन्ही अर्ज भिन्न विशेष न्यायाधिशांकडे सुनावणीला आले. दोन भिन्न न्यायाधिशांनी दोन भिन्न आदेश पारित केले. नवलखा हे ज्येष्ठ नागरिक असल्याने आणि त्यांना मलेरिया किंवा डेंग्यू यांचे आजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. काळे अन् ‘ऑर्डर सर्कल इन्चार्ज’ मोटे यांनी त्यांना मच्छरदाणी वापरण्याची अनुमती दिली होती. आताच्या कारागृह अधिकार्‍यांनी ही अनुमती नाकारली. त्यामुळे नवलखा यांनी मच्छरदाणी वापरण्याची अनुमती मिळावी, यासाठी विशेष न्यायालयाला आवेदन दिले होते. हे प्रकरण न्यायालयासमोर आले, तेव्हा तळोजा कारागृहाच्या अधीक्षकांनी मच्छरदाणीच्या वापराला विरोध केला.

ते म्हणाले, ‘‘डासांना पळवण्यासाठी ‘ओडोमॉस’ किंवा उदबत्त्या वापरता येतील. पनवेल महानगरपालिकेकडून कारागृहामध्ये स्प्रे आणि फ्युमिगेशन (धूर आणि उग्र वासाचा वायू) नियमितपणे केले जाते. त्यामुळे डास नियंत्रणात आहेत. आरोपी मच्छरदाणीचा वापर आत्महत्या करण्यासाठी किंवा दुसर्‍याचा जीव घेण्यासाठी करू शकतात. या कारणाने मच्छरदाणी वापरायला बंदी आहे.’’ दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर ‘मोक्का’, ‘टाडा’, ‘पोटा’, ‘सिटी सिविल आणि सेशन्स न्यायालयाचे विशेष न्यायाधीश जयेश कटारिया यांनी ७ जुलै या दिवशी आरोपीचे आवेदन फेटाळले. ‘कारागृह अधिकार्‍यांनी १५ दिवसांतून एकदा स्प्रे, फ्युमिगेशन किंवा कीटकनाशकांची फवारणी (इन्सेक्टिसाइड्स) करावे, तसेच आरोपीला ऑईनमेंट्स, ओडोमॉस आणि उदबत्ती वापरायची अनुमती देण्यात आली आहे. कारागृह अधिकार्‍यांनीही योग्य ती काळजी घ्यावी’, असे या वेळी न्यायाधिशांनी सांगितले. अशा रितीने हे प्रकरण निकालात निघाले.

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

२. न्यायालयाने तळोजा कारागृहातील बंदीवान सुनील माने यांना मच्छरदाणी वापरण्याची अनुमती देणे

काही दिवसांपूर्वी अँटिलिया स्फोटके प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी आणि तळोजा कारागृहातील बंदीवान सुनील माने यांनी मच्छरदाणी वापरण्याची अनुमती मिळण्यासाठी विशेष न्यायाधिशांकडे आवेदन दिले. यात त्याने ‘बंदीवानांच्या हिताच्या गोष्टी कारागृह अधिकार्‍याने पुरवायला पाहिजे’, असे म्हटले. या आवेदनाची विशेष न्यायाधीश ए.एम्. पाटील यांच्या समोर सुनावणी झाली. या आवेदनाला कारागृह अधिकार्‍याकडून लेखी उत्तर देण्यात आले नव्हते. या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश पाटील यांनी आरोपीला मच्छरदाणी वापरण्याची अनुमती दिली.

३. कारागृह अधिकार्‍यांनी त्यांची भूमिका पडताळून घेणे आवश्यक !

नवलखा आणि माने हे दोघेही तळोजा कारागृहातीलच बंदीवान आहेत. दोघांना एकाच प्रकाराचे नियम आहेत. कारागृहातील नियमाप्रमाणे ते एकाच कारागृहात शिक्षा भोगत आहेत. तरीही मच्छरदाणीचा वापर करण्याची अनुमती देण्याविषयी दोन न्यायाधिशांनी परस्परविरोधी आदेश पारित केले. ‘कारागृहातील नियमाप्रमाणे आदेश देण्यात आला’, असे दोन्ही न्यायाधीश म्हणतात. मग आरोपींकडे बघून नियम पालटतात का ? बंदीवानांनी केलेल्या मागणीला विरोध करायचा कि समर्थन करायचे, हे कारागृह अधिकारी ठरवतात का ? दोन्ही बंदीवानांनी एकाच प्रकारची मागणी केली असतांना भिन्न न्यायाधिशांनी वेगळे निवाडे कसे दिले ? याविषयीचा संभ्रम सामान्य जनतेच्या मनात निर्माण होऊ शकतो. याठिकाणी गौतम नवलखा यांची बाजू घेण्याचा प्रयत्न नाही, तर ‘कारागृह अधिकार्‍यांनी त्यांची भूमिका पडताळून पहावी’, असे वाटते.’

श्रीकृष्णार्पणमस्तु ।’

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय. (१२.७.२०२२)