स्वामी विवेकानंद आणि जागतिक ‘विश्वबंधुत्व दिन’ !

‘जगभरात ११ सप्टेंबर हा दिवस ‘विश्वबंधुत्व दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील ‘सर्वधर्म परिषदे’मध्ये अतिशय प्रभावी भाषण केले होते. त्यामुळे संपूर्ण जगाला भारताच्या हिंदुत्वाची माहिती मिळाली होती. स्वामीजींनी जगाला भारताच्या अमर्याद शक्तीचा परिचय करून दिला. यापूर्वी ११ सप्टेंबर या दिवसाचे महत्त्व विश्वाला ठाऊक नव्हते; कारण आपण आपल्याकडील आध्यात्मिक शक्ती कुणासमोरच उघड केली नव्हती. ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी स्वामी विवेकानंद भगवे कपडे परिधान करून अमेरिकेत पोचले. त्या वेळी ‘जगाला देण्यासाठी भारताकडे पुष्कळ काही आहे’, असा प्रचंड आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता. स्वत:विषयी असा विश्वास असणे, ही एक असामान्य घटना होती !

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. स्वामी विवेकानंद यांनी  ‘जागतिक सर्वधर्म परिषदे’त भारताच्या अमर्यादित शक्तीचा परिचय करून देणे

तत्कालीन परिस्थिती पाहिली, तर सगळीकडे नकारात्मकता होती. आपल्याला स्वतःचा विचार मांडण्याचा अधिकारच नव्हता. सगळीकडून विरोधाचे स्वर उमटत होते. स्वामीजींकडे अशी कुठलीतरी शक्ती होती की, जिच्यामुळे त्यांच्यावर कोणतेही दडपण आले नाही.

११ सप्टेंबर १८९३ हा दिवस उजाडला. ते ‘सर्वधर्म परिषदे’मध्ये भाषण देण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी ‘माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो’, हे शब्द उच्चारले. तेव्हा अनेक मिनिटे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता. या दोन शब्दांनी भारताच्या अमर्यादित शक्तीचा परिचय करून दिला होता. त्या वेळी जगातील अनेक दिग्गज तेथे उपस्थित होते. स्वामीजींनी एखाद्या कुशल वक्त्याप्रमाणे जागतिक सभेमध्ये भाषण दिले. या दिवशी स्वामी विवेकानंदांनी जगाला जिंकून घेतले होते. त्यांच्या भाषणाने जगात एक इतिहास रचला गेला.

२. ‘जागतिक सर्वधर्म परिषदे’साठी जगभरातील सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणे

स्वामी विवेकानंद यांना जागतिक व्यासपिठावर बोलण्याची संधी देण्यामागेही कारण होते. वर्ष १४९२ मध्ये कोलंबसने अमेरिकेच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले होते. त्यानुसार वर्ष १८९२ मध्ये या घटनेला ४०० वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्त अमेरिकेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून शिकागो येथे ‘जागतिक सर्वधर्म परिषद’ आयोजित करण्यात आली होती. तेथे सर्व धर्मीय विचारांचे आदानप्रदान होणार होते. वरवर पाहिले, तर आयोजकांचा
हेतू अतिशय चांगला असल्याचे दिसते; पण तसे नव्हते. त्यांना ‘अमेरिका आणि युरोप हेच श्रेष्ठ देश आहेत अन् त्यांचा धर्म हाच सर्वश्रेष्ठ आहे’, असे या परिषदेच्या माध्यमातून सांगायचे होते.

(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM) 

३. ‘विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेसाठी कुणीही स्वतःचा धर्म पालटण्याची आवश्यकता नाही’, असे स्वामीजींनी सांगणे

स्वामी विवेकानंद हे हिंदु धर्माचे प्रतिनिधी म्हणून परिषदेला उपस्थित होते. परिषदेला जाण्यापूर्वी त्यांनी कन्याकुमारी येथील समुद्रातील शिलाखंडावर बसून ३ दिवस चिंतन केले. त्यानंतर त्यांचा अमेरिकेला जाण्याचा विचार निश्चित झाला. त्या वेळी म्हैसूरूच्या राजांनी स्वामीजींना अमेरिकेच्या प्रवासासाठी आर्थिक साहाय्य केले. ते मुंबई येथून बोटीने अमेरिकेला मार्गस्थ झाले. या वेळी बोलतांना ते म्हणाले, ‘‘विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेसाठी कुणीही स्वतःचा धर्म पालटण्याची आवश्यकता नाही. आपण ज्या धर्मात रहातो, त्याच धर्माचे वैशिष्ट्य कायम ठेवून चांगले काम करू शकतो.’’

स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ‘‘आम्हाला माणूस घडवणारा धर्म हवा आहे आणि माणसे हवी आहेत.’’ त्या दृष्टीने ११ सप्टेंबर हा दिवस स्वामीजींचा समजला जातो.

४. भारतीय तरुणांनी स्वामीजींकडून प्रेरणा घेणे भारतासाठी लाभदायक !

त्यांनी शिकागोमध्ये भाषण केले, तेव्हा त्यांचे वय ३० वर्षे होते. आज भारताची ६५ टक्के लोकसंख्या ही ३० वर्षे वयोगटाच्या आतील आहे. या तरुणांना स्वामी विवेकानंद यांच्याकडून प्रेरणा मिळाली, तर जगात भारत अतिशय चांगले काम करू शकतो त्यांनी स्वतःच्या कल्पनेचे रूपांतर ध्येयवादात केले. आज आपण ‘भारतमाता की जय ।’ आणि ‘वन्दे मातरम् ।’ या घोषणा देतो; परंतु आपण आपली देशाविषयी असलेली कर्तव्ये प्रामाणिकपणे करण्यात कुचराई करतो.

५. भारतीय युवकांनी देशाच्या समस्येवर उत्तरे शोधून नवनवीन उत्पादने निर्माण करणे आवश्यक !

आज भारतात ‘मेक इन इंडिया’ यांसारखे अनेक चांगले प्रयोग चालू आहेत; पण त्यालाही अनेक जण विरोध करत असतात. स्वामी विवेकानंद यांनी भारतात कृषी क्रांती घडवण्यासाठी डॉ. सेन यांच्या नेतृत्वाखाली ‘विवेकानंद कृषी संशोधन संस्था’ स्थापन केली. त्यांना वाटायचे की, ज्ञान आणि कौशल्य हे वेगळे करायला पाहिजे. त्यांनी विकासासाठी ते एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. ‘भारतीय युवक हे काम मागणारे नकोत, तर रोजगार निर्माण करणारे असले पाहिजेत’, असे स्वामीजी म्हणत. समाजाची प्रगती ही नित्य नाविन्यावर अवलंबून असते. देशाच्या युवा पिढीला काहीतरी नवसंकल्पना देत रहायला हवी. आपल्या युवकांनी देशाच्या समस्येवर उत्तरे शोधावीत आणि नव्या कल्पनांमधून नवनवीन उत्पादने निर्माण करावीत.

६. भारताच्या १३५ कोटी जनतेने १ पाऊल पुढे टाकले, तर देश १३५ पावले पुढे जाईल !

कोरोना संक्रमणामुळे जगात आर्थिक मंदी येत आहे. त्यामुळे सर्व जग भारताकडे एका वेगळ्याच दृष्टीने पहात आहे. त्यांना वाटते की, चीनऐवजी भारत हा जगाला अन्नधान्य आणि औद्योगिक वस्तू पुरवणारा देश होऊ शकतो. स्वामीजींनी एक पाऊल पुढे टाकले होते. भारताच्या १३५ कोटी जनतेने १ पाऊल पुढे टाकले, तर देश १३५ पावले पुढे जाईल. आपण कुठल्याही क्षेत्रात असलो, तरी तेथे जगातील सर्वश्रेष्ठ झालो पाहिजे. केवळ घोषणाबाजी करून उपयोग नाही. सतत काम करायला पाहिजे. अंतर्गत वादविवाद काही वर्षे बाजूला ठेवायला पाहिजेत. आपले संपूर्ण लक्ष देशाच्या प्रगतीकडे दिले पाहिजे.

७. स्वामीजींचे भाषण आचरणात आणायचे असल्यास भारताने विश्वगुरु होण्यासाठी पावले उचलावीत !

स्वामी विवेकानंद यांनी जो संदेश दिला होता, तो आजही लागू आहे. आज भारताला विश्वगुरु होण्याची चांगली संधी आहे. विश्वबंधुत्वाची कल्पना चांगली आहे. भारत ही जगातील सर्वांत प्रगती करणारी अर्थव्यवस्था आहे. या गोष्टींचा लाभ घेऊन आपण जगाला आपल्या शक्तीचा परिचय करून दिला पाहिजे. स्वामी विवेकानंद यांना हेच सांगायचे होते.

१२५ वर्षांपूर्वीचे स्वामीजींचे भाषण आचरणात आणायचे असेल, तर आज भारताने विश्वगुरु होण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.