संभाजीनगर – ७ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता आयकर विभागाच्या ४-५ पथकांनी शहरातील एकूण ७ ठिकाणी धाडी घातल्या. यामध्ये ४ उद्योजकांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. शहरातील मोठे उद्योजक सतीश व्यास यांच्या ज्योतीनगर येथील निवासस्थानी पहाटे ४ वाजता आयकर विभागाने धाड टाकली. राजस्थानात मध्यान्ह भोजन देण्याचे कंत्राट व्यास यांच्याकडे होते. त्याविषयी ही पडताळणी चालू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये नेमकी किती लाख रुपयांची रक्कम हाती लागली, याविषयी माहिती मिळाली नाही.
आयकर विभागाने ही कारवाई कशासाठी किंवा कोणत्या विषयी केली आहे. याची स्पष्टता अद्याप करण्यात आलेली नाही; मात्र व्यास कुटुंबीय हे आधीपासून शिवसेनेच्या जवळीक असलेले कुटुंब मानले जाते. सतीश व्यास यांचे पुत्र मिथून सतीश व्यास हे युवासेनेचे जिल्हा चिटणीस पदावर कार्यरत आहेत. शिंदे गटात शहरातील अनेक नेते भरती झाले; मात्र मिथून व्यास हे शिवसेनेत कायम आहेत. सकाळपासून त्यांच्या घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले असून यात महिला पोलीस कर्मचारीही आहेत.