प्रिन्स चार्ल्स बनले ब्रिटनचे नवे राजे !

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन

डावीकडून ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ आणि द्वितीय प्रिन्स चार्ल्स

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय (वय ९६ वर्ष) यांचे ८ सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा स्कॉटलंड येथे निधन झाले. महाराणी एलिझाबेथ यांचे पार्थिव स्कॉटलँडहून शाही रेल्वेने बकिंघम पॅलेस या ठिकाणी आणले जाणार आहे. तसेच पुढचे १० दिवस ते ठेवले जाईल. दहाव्या दिवशी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स नवे राजे झाले आहेत. ते आता ‘राजे चार्ल्स तिसरे’ म्हणून ओळखले जातील. त्यांची पत्नी कॅथरीन ‘डचेस ऑफ कॉर्नवॉल’ म्हणून ओळखली जाणार आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ३ वेळा भारताला भेट दिली होती. वर्ष १९६१, १९८३ आणि १९९७ मध्ये त्या भारताच्या दौर्‍यावर आल्या होत्या. त्या गेली ७० वर्षे महाराणी होत्या.

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूविषयी जगभरात शोक व्यक्त होत असतांना अर्जेंटिनाच्या एका वृत्तवाहिनीच्या सूत्रसंचालकाने मात्र महाराणीच्या मृत्यूचा आनंद साजरा केला. त्याचे नाव ‘सँटियागो कुनेओ’ आहे. याविषयीच्या व्हिडिओमध्ये तो महाराणीच्या मृत्यूवर टाळ्या वाजवत आनंद व्यक्त करत आहे. तो म्हणतो, ‘योग्य व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि वृद्ध स्त्री शेवटी नरकात गेली आहे. मी अनेक वर्षांपासून एलिझाबेथ राणीच्या मृत्यूची वाट पहात होतो.’