प्रभु श्रीरामांचे विडंबन करणार्‍या आस्थापनाच्या विरोधात बांदा येथील रामभक्तांचे ‘त्याग’ आंदोलन वर्षभर चालू

  • आस्थापनाच्या कापरावर घातला बहिष्कार

  • गणेशोत्सवाच्या काळात दलालाला पाठवले माघारी

  • भाजपचे आमदार नितेश राणे आणि बांदा सरपंच अक्रम खान यांनी घेतली नोंद

बांद्याचे सरपंच अक्रम खान यांच्याशी चर्चा करतांना नितेश राणे

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – कापराच्या विज्ञापनाच्या माध्यमातून प्रभु श्रीरामाचे विडंबन करणार्‍या आस्थापनाच्या विरोधात तालुक्यातील बांदा येथील रामभक्तांनी गेले वर्षभर ‘त्याग’ (संबंधित आस्थापनाचे साहित्य न घेणे) आंदोलन चालू ठेवले आहे. यामध्ये बांद्यातील ५ देवस्थाने, १६ व्यापारी आणि २०० हून अधिक सेवेकरी सहभागी झाले आहेत. ‘या आंदोलनाची राजकीय पक्षांनी नोंद घ्यावी’, असे आवाहन आंदालनाचे प्रणेते तथा पत्रकार आशुतोष भांगले यांनी केल्यानंतर बांद्याचे सरपंच अक्रम खान यांनी कणकवली येथे भाजपचे आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांना या ‘त्याग’ आंदोलनाची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी श्रीरामाच्या विडंबनाविषयी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली अन् याच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

कापराच्या विज्ञापनातून प्रभु श्रीराम यांचे विडंबन होत असल्याचे समजल्यावर बांदा येथील पत्रकार तथा श्री विठ्ठल मंदिराचे सेवक श्री. आशुतोष भांगले यांनी गेल्या वर्षी स्वत: या आस्थापनाचा कापूर वापरणे बंद केले. त्यानंतर याविषयी वृत्तपत्रांतून बातमी प्रसिद्ध करून, तसेच सामाजिक माध्यमांतून आवाहन करत ‘त्याग’ आंदोलनाला प्रारंभ केला होता. या वेळी भांगले यांनी ‘हे विज्ञापन बंद करून आस्थापनाने सार्वजनिक क्षमा मागावी’, अशी मागणी केली होती.
पुढे हे आंदोलन वाढले आणि बांदा येथील रामभक्त व्यापार्‍यांनी गेले वर्षभर या कापुराची खरेदी-विक्री बंद केली. यावर्षीही श्री गणेशचतुर्थीच्या कालावधीत आस्थापनाच्या दलालाला (एजंटला) मागणी न देता माघारी पाठवले.

रामभक्तांची खंत

प्रभु श्रीरामचंद्र यांचा एवढा उघड अवमान  होऊनही देशातील कोणत्याच हिंदुत्वनिष्ठ नेत्याने याची नोंद न घेतल्याची खंत रामभक्तांना होती. आशुतोष भांगले यांनी या वर्षी श्रावण मासात ‘राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांना याविषयी माहिती द्यावी’, असे सार्वजनिक आवाहन केले होते. त्यानुसार सामाजिक माध्यमातून केलेले हे आवाहन ऐकून बांदा सरपंच अक्रम खान यांनी हा विषय आमदार राणे यांच्या समोर मांडला आणि बांद्यातील ‘त्याग’ आंदोलनाचे ध्वनीचित्रीकरण (व्हिडिओ) दाखवला. याची नोंद घेत आमदार राणे यांनी त्या विज्ञापनावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

या विषयाची नोंद घेतल्याविषयी या आंदोलनाचे प्रणेते भांगले यांनी आमदार आ. नितेश राणे यांचे आणि हा विषय त्यांच्यापर्यंत पोचवल्याविषयी सरपंच अक्रम खान यांचे  आभार व्यक्त केले आहेत.

‘त्याग’ आंदोलनात सहभागी झालेल्यांची भेट घेऊन आमदार राणे त्यांचे अभिनंदन करणार !

या आंदोलनाविषयी समजल्यावर आमदार राणे यांनी ‘त्याग’ आंदोलनाचे प्रणेते आशुतोष भांगले, तसेच बांद्यातील रामभक्त व्यापारी, देवस्थाने आणि त्यांचे सेवेकरी यांचे विशेष अभिनंदन केले आहे. ‘देव, देश आणि धर्म यांच्या विडंबनाचे प्रकार आपण खपवून घेणार नाही. हिंदु धर्मावरील अशा अनेक विषयांवर विधानसभेत आवाज उठवू’, असे आश्वासन दिले. बांदा येथे जाऊन आशुतोष भांगले, तसेच बांद्यातील धर्मनिष्ठ भाविक, व्यापारी आणि सेवेकरी यांना भेटून त्यांचे अभिनंदन करणार असल्याचेही त्यांनी आमदार राणे सांगितले आहे.

सनदशीर मार्गाने चालू असलेले आंदोलन

कोणतीही तोडफोड नाही. अपशब्द नाही. ‘बॅनरबाजी’ नाही, तसेच आस्थापनाचे नावही न घेता आंदोलन चालू आहे. या आंदोलनाचा परिणाम म्हणजे ‘ते’ वादग्रस्त विज्ञापन दूरदर्शन वाहिन्यांवर दाखवण्याचे प्रमाण उणावले, असले, तरी ‘यूट्यूब’ या प्रसारमाध्यमातून चालू आहे. त्या आस्थापनाने अद्याप सार्वजनिक क्षमा मागितलेली नाही, असे भांगले यांनी सांगितले.