आतंकवादी याकुब मेमनच्या कबरीच्या उदात्तीकरणाविषयी राज्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया

देशद्रोही याकूब मेमन याच्या कबरीचे सौंदर्यीकरण करणार्‍या दोषींवर कठोर कारवाई करावी ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना, म्हणजे त्यांच्या सहमतीने देशद्रोही याकूब मेमन याच्या कबरीवर सौंदर्यीकरण झाले आहे. लोकांना भेटण्यासाठी वेळ न देणार्‍या उद्धव ठाकरे यांनी याकूब मेमन याच्या कबरीला अलिखित अनुमती कशी दिली ? त्याचा निषेध राज्यभर होत आहे. महाविकास आघाडी सरकार चालवण्याकरिता, तसेच स्वतःचे मुख्यमंत्रीपद टिकवण्याकरिता उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी किती तडजोड केली, हेच यावरून दिसून येते, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ८ सप्टेंबर या दिवशी येथे एका पत्रकार परिषदेत केली. दोेषींविरुद्ध गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

बावनकुळे पुढे म्हणाले की, आतंकवादी याकूबच्या कबरीचे सुशोभिकरण करणार्‍यांना सरकारने त्वरित शोधून काढावे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील गृहमंत्र्यांनी या प्रकरणी काय केले ? त्यांना त्यांचे पद टिकवण्यासाठी हे करावे लागले का ?  स्वतःचे मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी अशा अनेक घटनांचे समर्थन केले आहे, हे ठाकरे यांनी मान्य केले पाहिजे.


याकुब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण करणार्‍यांची चौकशी करावी ! – नितेश राणे, आमदार, भाजप

नितेश राणे

या संदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले की, अनेक लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त करणार्‍या याकुब मेमनच्या कबरीवर थुंकले पाहिजे, त्याऐवजी त्याचे उदात्तीकरण करून त्याची सजावट करण्याचे अधिकार कुणी दिले, याची चौकशी करावी. उद्धव ठाकरे यांच्या महानगरपालिकेने हे काम केले. बाळासाहेबांनी पूर्ण आयुष्य संघर्ष केला. त्यांच्या पुत्राने मेमला मोठे करण्याचे काम केले. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व अक्षरशः विकले आहे.


भाजपने याकुबचा मृतदेह कुटुंबियांना का दिला ? – अतुल लोंढे, प्रवक्ते, काँग्रेस

भाजपने याकुबचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना का दिला ? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. आम्ही त्याला फाशी दिले आहे. हा विषय महानगरपालिकेचा असून तेथे वर्षानुवर्षे शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे.


याकूब मेमनच्या कबरीची सजावट आणि रंगरगोटी केल्याच्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी ! – आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष, भाजप

आशिष शेलार

सत्तेतील शिवसेना जेव्हा विरोधी पक्षात गेल्यावर कुख्यात आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याचे समर्थक होते; मात्र आता ते दाऊद याचे प्रचारक आहेत. सुशोभिकरणासाठी अनुमती देण्याचे दायित्व मुंबई महानगरपालिकेचे असते. आतंकवादी याकूबच्या कबरीचा देखावा आणि रंगरगोटी यांसाठी महानगरपालिकेने अनुमती दिलीच कशी ? हे कुणाच्या सांगण्यावरून केले ?, यांची चौकशी होणे आवश्यक आहे. महापौर शिवसेनेचा होता. मुख्यमंत्री तुम्ही (उद्धव ठाकरे) असतांना दाऊदचे प्रचारक म्हणून काम करत होता, असा आरोप मुंबई येथील भाजपचे अध्यक्ष तथा आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी ८ सप्टेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केला.

ते पुढे म्हणाले की, ‘पेंग्विन सेने’च्या युवा अध्यक्षांनी ‘कबर बचाव अभियान’ चालू करावे. आतंकवादी याकूब मेमन याच्या फाशीला विरोध करणारे अस्लम शेख मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी याकूबला फाशी न देण्यासाठी राष्ट्रपतींना अर्ज केला होता. ‘पेंग्विन सेना’ ही ‘तुकडे तुकडे टोळी’चे समर्थन करत आहे.


राजेशाही असती, तर मेमनच्या कबरीचा बंदोबस्त केला असता ! – खासदार उदयनराजे भोसले

लोकांनी ‘राजेशाही नको, तर लोकशाही हवी’, अशी मागणी केली. त्यामुळे याकूब मेमनच्या कबरीवर असे प्रकार होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने याच्या अन्वेषणाचा आदेश दिला आहे. राजेशाही असती, तर आम्ही त्या कबरीचा कधीच बंदोबस्त केला असता, अशी प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.


काँग्रेसने क्षमा मागावी ! – भातखळकर, भाजप

याकुबची फाशी टाळण्यासाठी जे लोक न्यायालयात गेले, त्यांत काँग्रेसचा समावेश होता. याकुबची फाशी टाळण्यासाठी काँग्रेसचे नेते स्वाक्षर्‍या करायला का गेले होते ? ही राष्ट्रविरोधी भूमिका आहे, हे स्पष्ट आहे.


  • आतंकवाद्याचे मानसन्मानाने दफन का करू दिले ? त्याची मोठी अंत्ययात्रा का काढू दिली गेली ? त्या वेळी सरकार कुणाचे होते ? – आदित्य ठाकरे, आमदार, शिवसेना

  • या प्रकाराचा उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध नाही. सरकारने चौकशी करावी आणि कारवाई करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. मुख्य म्हणजे ते कब्रस्तान खासगी आहे. तेथील निर्णय सरकार घेत नाही. हा अश्लाघ्य प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. – अरविंद सावंत, खासदार, शिवसेना

  • आतंकवादी मेमनची कबर समुद्रात विसर्जित करू. आतंकवाद्यांचे उदात्तीकरण महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही ! – अजय सिंह सेंगर, करणीसेना प्रमुख

  • गृहमंत्री फडणवीस यांनी या घटनेची चौकशी करण्याचा आदेश देण्याचा निर्णय घेतला आहे ! –  सुधीर मुनगंटीवार, भाजप


कब्रिस्तानच्या विश्वस्तांनी याकूब मेमनच्या कबरीवर ‘देशद्रोही’ असा फलक लावावा ! – आनंद दवे, हिंदु महासंघ

पुणे – याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण झाल्यानंतर आता अनेक राष्ट्रनिष्ठ, हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून रोष व्यक्त केला जात आहे. हिंदु महासंघाचे श्री. आनंद दवे यांनीही या घटनेचा निषेध करत ‘याकूब मेमनच्या कबरीवर ‘देशद्रोही’ असा फलक लावावा !’ अशी थेट मागणी याकूब मेमनची कबर असलेल्या ‘बडा कब्रिस्तान (मुंबई)’च्या विश्वस्तांकडे प्रसिद्धीमाध्यमांद्वारे केली आहे. त्यांनी शासनालाही मागणी केली आहे की, ‘देशद्रोही याकूबला जिथे गाडण्यात आले, त्या जागेचे सुशोभीकरण होणे दुर्दैवी आहे. आज सुशोभीकरण झाले, उद्या मोठे स्मारक उभे राहील. असे व्हायला नको, यासाठी थडग्याच्या सुशोभीकरणाला आर्थिक साहाय्य करणार्‍या सर्वांची चौकशी व्हायला हवी, तसेच या अयोग्य कृतीमध्ये सहभागी असलेल्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा.’