भाग्यनगर पोलिसांनी ६ मास चालवलेल्या मोहिमेमुळे गोव्यातील मोठ्या अमली पदार्थ व्यावसायिकांचे जाळे उघडकीस !

ज्या पद्धतीने भाग्यनगर पोलीस अमली पदार्थ व्यावसायिकांपर्यंत पोचले, तसे गोवा पोलिसांना का जमले नाही ?

पणजी, ५ सप्टेंबर (वार्ता.) – भाग्यनगर पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एच्-न्यू : हैद्राबाद नार्काेटिक्स एन्फोर्समेंट विंग) ६ मास चालवलेल्या मोहिमेमुळे गोव्यातील मोठ्या अमली पदार्थ व्यावसायिकांचे जाळे उघडकीस आले आहे. यासाठी या पथकाने स्थानिक अमली पदार्थ ग्राहकांचे साहाय्य घेतले, तर वेळप्रसंगी स्वत: ग्राहक बनून अमली पदार्थ मागवून अमली पदार्थांचा पुरवठा करणार्‍यांचा विश्वास संपादन करून गोव्यातील मोठ्या अमली पदार्थ व्यावसायिकांचा कणाच मोडला. ‘एच्-न्यू’ दलाने यासाठी अमली पदार्थ व्यवसायासाठी वापरण्यात येणार्‍या ‘डार्कबेव’ या अनधिकृत ‘वेब ब्राउझर’चीही हाताळणी केली आणि त्या आधारे अमली पदार्थांचा पुरवठा करणार्‍यांची पाळेमुळे उघडकीस आणली. भाग्यनगरमधील शहर पोलीस आयुक्तांनी नुकतेच येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी यासंबंधी अनेक माहिती पोलिसांनी उघड केली.

भाग्यनगर पोलिसांनी सर्वप्रथम फोंडा, गोवा येथील निवासी प्रीतेश बोरकर (उपाख्य काली) याला ३ ऑगस्ट या दिवशी कह्यात घेतले. पोलिसांच्या मते प्रीतेश बोरकर हा मोठा अमली पदार्थ व्यावसायिक असून तो भाग्यनगर येथे ग्राहकांना घाऊक पद्धतीने अमली पदार्थांचा पुरवठा करत होता. पोलिसांनी कह्यात घेतल्यानंतर प्रीतेश बोरकर याने तो हणजुणे गोवा येथील ‘कर्लिस’ उपाहारगृहाचे मालक एडवीन न्युनीस त्याचा मुख्य पुरवठादार असल्याचे सांगितले. पोलिसांच्या मते तुकाराम साळगावकर (उपाख्य नाना), विकास नाईक (उपाख्य विकी), रमेश चव्हाण, स्टीव्ह, एडवीन न्युनीस आणि सांजा गावकर हे गोव्यातील मुख्य अमली पदार्थ व्यावसायिक आहेत आणि ते गोव्यातील रहिवासी मझूर अहमद याला आणि मझूर अहमद पुढे प्रीतेश बोरकर याला अमली पदार्थांचा पुरवठा करत होता. हे अमली पदार्थांचे जाळे मागील ८ वर्षे कार्यरत होते आणि ते गोव्यात हणजुणे समुद्रकिनारा, तसेच तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश येथे ‘मेथाफेटामाईन’, कोकेन, एल्.एस्.डी., ‘एम्.डी.एम्.ए.’ आदी अमली पदार्थांचा पुरवठा करत होते. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा पूर्ण पाठिंबा आणि भाग्यनगर शहर पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद यांचे मार्गदर्शन यांमुळे ‘एच्-न्यू’ पथकाने अमली पदार्थांचा पुरवठा करणार्‍यांची पाळेमुळे खणून काढली.

‘एच्-न्यू’ पथकाने सापळा रचून अत्यंत शिताफीने राबवली मोहीम

१. ‘एच्-न्यू’ पथकाने मोहिमेसाठी अमली पदार्थांच्या जुन्या ग्राहकांचे साहाय्य घेतले आणि वेळप्रसंगी स्वत: ग्राहक बनले. या वेळी विविध संदेशवहन ॲपच्या माध्यमांतून अमली पदार्थ व्यावसायिकांना संपर्क करण्यास प्रारंभ करण्यात आला. एकाच वेळी अधिक अमली पदार्थ मागवण्यात येऊ लागले. स्वत: ग्राहक बनलेल्या ‘एच्-न्यू’ पथकाच्या सदस्यांनी ‘आम्ही अमली पदार्थ घेण्यासाठी भाग्यनगर येथून गोव्यात येऊ शकत नाही’, असे अमली पदार्थ पुरवठा करणार्‍यांना सांगितले. यामुळे मागणीनुसार गोव्यातून थेट भाग्यनगर येथे अमली पदार्थांचा पुरवठा करणे चालू झाले. अमली पदार्थांची वारंवार मागणी करून अमली पदार्थ व्यावसायिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. यानंतर ‘एच्-न्यू’ पथकाने कारवाई करून काही अमली पदार्थ व्यावसायिकांना कह्यात घेतले.

२. यानंतर ‘एच्-न्यू’ पथकाच्या सदस्यांनी काही अमली पदार्थ ग्राहकांच्या साहाय्याने अमली पदार्थांचा पुरवठा करणारा ‘डार्कबेव’ हा अनधिकृत ‘वेब ब्राउझर’ हाताळणे प्रारंभ केले. ‘डार्कबेव’च्या माध्यमातून ३ निरनिराळे ‘कार्टेल’ (पुरवठा करणार्‍यांचा एक समूह) उघडकीस आणले. या वेळी एका अमली पदार्थ व्यावसायिकाच्या ‘झंबाडा कार्टेल’ची माहिती मिळाली. या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण ‘क्रिप्टो करन्सी’च्या (आभासी चलनाच्या) माध्यमातून होत असे.

३. अमली पदार्थांचे ग्राहक आणि पुरवठादार यांचे सातत्याने अन्वेषण केल्यानंतर ‘एच्-न्यू’ पथकाने अमली पदार्थ व्यवसायातील प्रमुखांची एक सूची सिद्ध केली आणि यामध्ये १७४ नावे आहेत. ‘एच्-न्यू’ पथकाच्या मते गोव्यात काही मोठे अमली पदार्थ व्यावसायिक प्रतिमास ३ लाख रुपये भाडे देऊन आलिशान बंगाल्यामध्ये निवास करतात. हा बंगला अमली पदार्थ साठवून ठेवण्यासाठीही वापरला जातो.

भाग्यनगर पोलीस गोवा पोलिसांच्या साहाय्याने यापुढे गोव्यातील मोठ्या अमली पदार्थ व्यावसायिकांवर कारवाई करण्याची शक्यता आहे.