सनातनच्या आश्रम परिसरातील ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धीविनायकाच्या मूर्तीवर पडलेल्या सूर्यकिरणांमागील अध्यात्मशास्त्र !

‘१०.३.२०२१ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीवर टप्प्याटप्प्याने प्रकाश पडल्याने मूर्ती अधिकाधिक तेजस्वी दिसत होती. आश्रमाच्या बांधकामाच्या रचनेनुसार या मूर्तीवर प्रत्यक्ष सूर्यकिरण येऊ शकत नाहीत; परंतु आश्रमाच्या स्वागतकक्षाबाहेरील परिसरातील (‘पोर्च’मधील) लादीवर पडलेल्या सूर्यकिरणांचे परावर्तन होऊन श्री सिद्धिविनायकाच्या चरणांखालील कमळापासून मुकुटापर्यंत हा प्रकाश पडला आहे. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

१. श्री गणेशामध्ये कोटी सूर्याचे तेज सामावले असल्यामुळे तो तेजस्वी आणि ओजस्वी दिसणे

श्री गणेश बुद्धीची देवता आहे. श्री गणेशाचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे आहे. तेजस्वी म्हणजे तेज:पूंज आणि ओजस्वी म्हणजे प्रभावी आणि बाणेदार. श्री गणेशामध्ये ही दोन्ही गुणवैशिष्ट्ये असल्यामुळे त्याला तेजस्वी आणि ओजस्वी असे संबोधले आहे.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

वरील श्लोकातून हे सुस्पष्ट होते की, श्री गणेशामध्ये कोटी सूर्यांचे तेज सामावले आहे. त्यामुळे श्री गणेशाभोवती दिव्य तेजाची आभा दिसते आणि त्यातून निर्माण होणारी प्रभावळींची वलये विश्वाला व्यापून टाकतात. अशा प्रकारे श्री गणेश तेजोमय आहे. त्यामुळे त्याचे रूप, कांती आणि अस्तित्व दिव्य तेजाप्रमाणे अतिशय तेजस्वी दिसत आहे.

श्री गणेशाची बुद्धी आणि वाणी यांमध्ये ज्ञानाचे तेज सामावले असल्यामुळे त्याची बुद्धी आणि वाणी ओजस्वी आहे. अशा तेजस्वी आणि ओजस्वी श्री गणेशाला आमचे कोटीशः नमन !

कु. मधुरा भोसले

२. श्री ऋद्धि-सिद्धिसहित सिद्धिविनायकाच्या मूर्तीवर टप्प्याटप्प्याने प्रकाश पडण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

२ अ. भक्तीमार्गानुसार विश्लेषण

२ अ १. सूर्यकिरणांमुळे श्री गणेशाच्या चरणांपासून मस्तकापर्यंत किरणोत्सव होऊन संपूर्ण मूर्तीतील दिव्यत्व जागृत होणे : ‘सूर्य, गणपति, शिव, देवी आणि विष्णु’ या पाच देवतांना ‘पंचायतन देवता’ असे म्हणतात. सूर्य आणि गणपति हे पंचायतन देवतांपैकी आहे. श्री गणेश प्रथम पूज्य, विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता आहे. १०.३.२०२१ या दिवशी पृथ्वीवर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्री राजमातंगी याग चालू असतांना या यागात येणारे अडथळे दूर करण्यासाठी सूर्यदेवाने विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या तत्त्व जागृतीचे कार्य हाती घेतले. या कार्याच्या अंतर्गत त्याच्या किरणांनी प्रथम श्री गणेशाच्या पद्मासनाला स्पर्श करून स्थळाची शुद्धी केली. त्यानंतर हे सूर्यकिरण वरच्या दिशेने गेले. त्यामुळे श्री गणेशाचे मूलाधारचक्र जागृत झाले. अशा प्रकारे जस जसे सूर्यकिरण श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीवर वरच्या दिशेने जात होते, तस तशी त्याची वरची चक्रे जागृत झाली. शेवटी सूर्यकिरणांनी श्री गणेशाच्या मस्तकाला स्पर्श करत त्याचे आज्ञाचक्र आणि सहस्रारचक्र यांना स्पर्श करून संपूर्ण मुकुट तेजोमय केला. अशा प्रकारे सूर्यकिरणांमुळे श्री गणेशाच्या चरणांपासून मस्तकापर्यंत किरणोत्सव होऊन संपूर्ण मूर्तीतील दिव्यत्व जागृत झाले. यालाच ‘दिव्य तेजाने दैवी तत्त्वाची जागृती करणे’, असे म्हणतात.

‘दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज ।।’ या ओळी माझ्या मनात तरळून गेल्या.

२ अ २. श्री गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडल्यामुळे सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे

२ आ. ज्ञानमार्गानुसार विश्लेषण

२ आ १. श्री गणेशाचे कार्य स्थळापुरते मर्यादित न रहाता काळाच्या स्तरावर चालू होणे : श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीमध्ये श्री गणेशाचे तत्त्व अप्रगट अवस्थेत होते. पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी श्री गणेशाचे तत्त्व सगुण-निर्गुण स्तरावर कार्यरत होणे आवश्यक होते. यासाठी श्रीविष्णूच्या आज्ञेने सूर्यदेवाने त्याचे सूर्यकिरण श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीवर पाडून श्री गणेशाचे सुप्तावस्थेतील तत्त्व जागृत केले. याला ‘तत्त्वजागृती’ असे म्हणतात. श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडल्यामुळे श्री गणेशाचे कार्य तेजतत्त्वाच्या स्तरावर म्हणजे सगुण-निर्गुण स्तरावर चालू झाले आणि श्री गणेशाचे ‘विघ्नहर्ता’ हे रूप सक्रीय झाले. त्यामुळे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या समष्टी कार्यात येणारे ४० टक्के अडथळे दूर झाले. अशा प्रकारे श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीवर पडलेल्या सूर्यकिरणांमुळे संपूर्ण पृथ्वीवरील सात्त्विक जिवांना लाभ झाला आणि श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे कार्य विशिष्ट स्थळापुरते मर्यादित न रहाता काळाच्या पातळीवर, म्हणजे समष्टी स्तरावर चालू झाले. अशा प्रकारे श्री गणेशाच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यामधील योगदान वाढले.

२ आ २. श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडल्यामुळे समष्टीला झालेला लाभ 

कृतज्ञता

‘श्री गुरूंच्या कृपेमुळे श्री ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीवर पडलेल्या सूर्यकिरणांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव उमजला आणि सूक्ष्मातून घडलेल्या घडामोडींचे ज्ञान झाले. यासाठी मी श्रीगुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.८.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.