पंढरपूर येथे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांवर प्राप्तीकर विभागाची कारवाई ! 

सोलापूर – पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि ‘डीव्हीपी’ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अभिजित पाटील यांचे पंढरपूर शहरातील निवासस्थान आणि कार्यालय येथे प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यांनी २६ ऑगस्ट या दिवशी एकाच वेळी धाड टाकली. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यासह अन्य कारखाने आणि पतसंस्था यांच्या कार्यालयावरही धाड टाकण्यात आली आहे.

प्राप्तीकर विभागाच्या तब्बल ३० ते ४० अधिकार्‍यांनी पंढरपूर येथील त्यांचे निवासस्थान, सोनालिका ट्रॅक्टर शोरूम, डीव्हीपी पतसंस्था यांसह अन्य साखर कारखान्यांवर एकाच वेळी धाड टाकली आहे. याविषयी पडताळणीसाठी व्यापारी, शेतकरी आणि कारखान्यांच्या संचालकांना बोलवण्यात आले होते. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

सोलापूर येथील डॉक्टरांचे घर आणि खासगी रुग्णालये येथेही प्राप्तीकर विभागाची कारवाई !

सोलापूर येथील हृदयरोगतज्ञ डॉ. गुरुनाथ परळे, डॉ. अनुपम शहा यांच्या घरावर, तसेच कुंभारी येथील ‘अश्विनी रुग्णालय’, ‘रघोजी रुग्णालय’ या खासगी रुग्णालयांवर प्राप्तीकर विभागाने २५ ऑगस्ट या दिवशी धाड टाकली. अधिकार्‍यांच्या वाहनावर ‘कृषी अभ्यास दौरा’, असे स्टीकर लावलेल्या वाहनांतून प्राप्तिकर विभागाची पथके शहरात आली होती. या पथकांमध्ये ५० अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग होता. शहर आणि ग्रामीण भागात काम करणार्‍या रुग्णालयांत हे पथक पोचले. या पथकाने रुग्णालयांच्या आर्थिक कारभाराच्या कागदपत्रांची पडताळणी केली, तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या घरांवरही धाड टाकण्यात आली आहे.