मुंबई, २८ ऑगस्ट (वार्ता.) – गणेशोत्सवाच्या कालावधीत भरमसाठ तिकीटदर आकारून खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून भाविकांची आर्थिक लूट चालू आहे. ‘या विरोधात तक्रार आली, तरच कारवाई करू’, अशी भूमिका घेणार्या मोटार वाहन विभागाने संकेतस्थळावर तक्रार करण्यासाठीची सुविधा बंद ठेवली आहे. अशा प्रकारे प्रवाशांना तक्रार प्रविष्ट करण्यासाठी कोणतीच सुविधा ठेवण्यात आलेली नाही. तक्रार करावयाची असल्यास मोटार वाहन विभागाच्या जिल्हा स्तरावरील उपप्रादेशिक कार्यालयात जाणे, हा एकच पर्याय उपलब्ध आहे. (मोटार वाहन विभागाचा भोंगळ कारभार ! – संपादक) राज्याच्या मोटार वाहन विभागाच्या ‘https://transport.maharashtra.gov.in’ या संकेतस्थळावर ‘नागरिक सेवा’ या पर्यायामध्ये नागरिकांना तक्रार करण्यासाठी ‘वेबसाईट’ आणि ‘अँड्रॉईड मोबाईल ॲप’ हे दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत; मात्र हे दोन्ही पर्याय बंद आहेत. मोटार वाहन विभागाचे राज्य परिवहन विभागाचे उपायुक्त अभय देशपांडे यांनी खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकिटाचे अधिक दर आकारले जात असतील, तर त्याविषयी तक्रार प्रविष्ट केल्यावरच कारवाई करण्यात येईल, असे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
प्रत्यक्षात मात्र मोटार वाहन विभागाच्या संकेतस्थळावर तक्रार करण्याची सुविधाच बंद करण्यात आली आहे. मोटार वाहन विभागाच्या संकेतस्थळावर राज्यातील स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे ‘ईमेल’ पत्तेही देण्यात आले आहेत; मात्र यांतील बहुतांश ‘ईमेल आयडी’ही बंद आहेत. जूनमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य मोहिमेच्या अंतर्गत शिष्टमंडळाने मोटार वाहन विभागाचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांच्या होत असलेल्या लूटमारीविषयीची माहिती पुराव्यांसह दिली. खासगी ट्रॅव्हल्सकडून भरमसाठ तिकीट आकरण्यात येत असल्याविषयीच्या बातम्या प्रसिद्धीमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात येत आहेत. असे असतांना याविषयी कारवाई करण्यास मोटार वाहन विभाग मात्र ढिम्म आहे.